
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशातील मतदार यादी आणि विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेवरून सत्ताधारी भाजपवर आरोप केले आहेत. उत्तर प्रदेशात लाखो बनावट मतदार असल्याचा दावा करत, एका व्यक्तीच्या नावावर तब्बल 10 मतदार ओळखपत्रांची नोंद असल्याचे त्यांनी म्हटले. अनेक विधानसभा मतदारसंघांमध्ये अशा बनावट मतदारांची प्रकरणे आढळल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकरणांची यादी लवकरच जाहीर करणार असल्याचेही यादव यांनी सांगितले.
पत्रकारांशी बोलताना अखिलेश यादव म्हणाले, “उत्तर प्रदेशात लाखो बनावट मते आहेत. एका व्यक्तीच्या नावावर तब्बल 10 मतांची नोंद आहे. अनेक विधानसभा मतदारसंघांमध्ये आम्हाला अशा बनावट मतदारांची प्रकरणे आढळली आहेत. आम्ही त्यांची यादी जाहीर करू. यावरून एसआयआर प्रक्रियेत अनियमितता झाल्याचे दिसते. एसआयआरवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आणि वेळही वाया गेला. उत्तर प्रदेशातील सर्व 403 विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपला हा कथित मतदार घोटाळा करून आम्ही त्यांना सोडणार नाही” असेही यादव म्हणाले.
अखिलेश यादव यांनी डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या सामाजिक समतेच्या विचारांचाही उल्लेख केला. लोहिया यांनी जातीयवाद आणि जातिव्यवस्थेला विरोध केला. धर्मनिरपेक्ष समाज कसा निर्माण करता येईल आणि समाजातील सर्व प्रकारचे भेदभाव कसे दूर करता येतील, याचा मार्ग त्यांनी दाखवला, असे यादव म्हणाले. “डॉ. राम मनोहर लोहिया यांनी समाजवादी विचारांच्या कार्यकर्त्यांची मोठी फळी तयार केली होती. त्याच मार्गावरून चालत आपण इथपर्यंत पोहोचलो आहोत, अशी आम्हाला आशा आहे,” असे त्यांनी सांगितले.




























































