
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विद्यार्थ्यांनीकेलेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारने रात्री उशिरा त्यांच्या मागण्या मान्य केल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विद्यार्थ्यांची आणि तरुणांची एकजूट किती ताकदवान आहे, हे या आंदोलनातून दिसून आल्याचे त्यांनी म्हटले. मात्र, विद्यार्थ्यांना आपल्या मागण्यांसाठी जवळपास 2 आठवडे धरणे आंदोलन करावे लागले, यावरून सरकारची क्रूरता दिसून येते, असा आरोपही त्यांनी केला.
आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली. राज्य सरकारने रात्री उशिरा विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य केल्याने विद्यार्थी शक्ती आणि युवा शक्तीच्या एकजुटीचा विजय झाल्याचे त्यांनी म्हटले.
मात्र, या विद्यार्थ्यांना त्यांच्या मागण्यांसाठी जवळपास 2 आठवडे आंदोलनाला बसावे लागले, ही दुर्दैवी बाब असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या मूळ तालुक्यांमध्ये भीषण दुष्काळाची परिस्थिती असताना आणि त्यांच्या कुटुंबीयांना अडचणींचा सामना करावा लागत असताना विद्यार्थ्यांना आंदोलन सुरू ठेवावे लागले, यावरून सरकारची असंवेदनशीलता दिसून येते, अशी टीका त्यांनी केली.
या आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आणि आंदोलकर्त्यांचे आदित्य ठाकरे यांनी अभिनंदन केले. भाजपचे सरकार हे जनतेचे सरकार नाही, हे लक्षात घेण्याची वेळ आली असल्याचेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले.
तसेच, कोणतेही सरकार कितीही क्रूर असले, तरी जनतेची एकजूट त्यापेक्षा अधिक सामर्थ्यवान असते, असा संदेशही ठाकरे यांनी दिला. MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या निमित्ताने विद्यार्थी आणि तरुणांच्या एकजुटीने सरकारला मागण्या मान्य करण्यास भाग पाडल्याचेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले.
The late-night acceptance of demands of the MPSC aspirants by the regime in Maharashtra shows the unity of student power and youth power!
However, it also shows the cruelty of the regime where the aspirants were made to sit on dharna for almost 2 weeks despite their own home talukas reeling under a terrible drought and their families having to face hardship.
My congratulations to everyone in this protest and it’s time we realise that the bjp regime does not belong to the people!
And also realise that people power is stronger than the most brutal regime.
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 12, 2026
























































