बँक दुष्काळ अन् खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून 41 वर्षीय तरुण शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
सततचा दुष्काळ, शेतातील पिके हातातोंडाशी आलेली असताना ती डोळ्यांसमोर जळून जाणे आणि खाजगी सावकारासह बँकांच्या कर्जाचा वाढलेला डोंगर यामुळे हवालदिल झालेल्या लांबोटा (ता. निलंगा) येथील एका 41 वर्षीय तरुण शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. अमोल पंढरीनाथ मुगळे (41) असे दुर्दैवी मृत शेतकऱ्याचे नाव असून, या घटनेमुळे निलंगा तालुक्यात तीव्र शोककळा पसरली आहे.
सध्या मराठवाड्यामध्ये गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने आणि कष्टाने खरीप हंगामात शेतात पिके घेतली होती; मात्र पावसाअभावी ही पिके पूर्णपणे सुकली व जळून खाक झाली. शेतात हजारो रुपयांची लागवड करून केलेली पेरणी डोळ्यांसमोर वाळत असल्याचे पाहून या शेतकर्‍यावर मोठे आर्थिक संकट ओढवले. बँकांचे व खाजगी सावकारांचे कर्ज कसे फेडायचे आणि आपल्या तीन मुलींचे शिक्षण व संसार कसा चालवायचा, याच विवंचनेतून अमोल मुगळे यांनी रविवारी (दि. 11) सायंकाळी आठ वाजता निलंगा शहरातील शिवाजीनगर येथील राहत्या घरी दोरीने गळफास घेत आत्महत्या केली.
​
या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट पसरली आहे. शासनाकडून दुष्काळग्रस्त भागाचे पंचनामे करण्यात आले असले, तरी अनेक ठिकाणी महिना उलटून गेला तरी अद्याप कोणतीही ठोस आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या हाती पडलेली नाही. जर वेळेत मदत मिळाली असती, तर कदाचित या तरुण शेतकऱ्याचा जीव वाचला असता, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. हाताजवळील सर्व पैसा शेतीत घातल्यामुळे शेतकरी आज अक्षरशः उघड्यावर पडला आहे आणि याच नैरासयातून शेतकरी टोकाचे पाऊल उचलत असल्याचे बोलले जात आहे.
​हसत्याखेळत्या कुटुंबावर ओढावले दुःखाचे डोंगर…

मयत अमोल मुगळे यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुली असा परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच निलंगा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर मृतदेह उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याने शेविच्छेदन करून अंत्यविधीसाठी प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिले. आज 12 ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यावर निलंगा येथे अंत्यविधी करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जमादार दयानंद वासुदेव पुढील तपास करत आहेत.