
श्रीक्षेत्र माहूर गडावर सुरू असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवासाठी देशभरातून भाविकांची गर्दी होत असतानाच, रेणुका मातेचे दर्शन घेऊन यवतमाळकडे परतणाऱ्या भाविकांच्या टेम्पोला माहूर घाटात भीषण अपघात झाला. समोरून येणाऱ्या वाहनाचा प्रखर प्रकाश डोळ्यांवर पडल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि मॅक्सिमो जितो टेम्पो सुमारे 100 फूट खोल दरीत कोसळला. शुक्रवार (दि. 16) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयामागील घाटातील पहिल्या धोकादायक वळणावर झालेल्या या अपघातात तिघांचा मृत्यू झाला, तर चालकासह अन्य दोघे किरकोळ जखमी झाले. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून घाटरस्त्यावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
यवतमाळ येथील फर्निचरच्या दुकानात काम करणारे सहा कामगार मॅक्सिमो जितो टेम्पोने गुरुवारी (दि. 15) रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास माहूरकडे दर्शनासाठी निघाले होते. रात्री बाराच्या सुमारास माहूर येथे पोहोचल्यानंतर त्यांनी श्री रेणुका मातेचे दर्शन घेतले. धार्मिक कार्यक्रम आटोपून शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास त्यांनी यवतमाळकडे परतीचा प्रवास सुरू केला. घाटातील पहिल्या धोकादायक वळणावर समोरून येणाऱ्या वाहनाचा प्रखर प्रकाश चालकाच्या डोळ्यांवर पडला. त्यातच समोरील वाहन विरुद्ध दिशेने आल्याने चालकाने टेम्पो बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो थेट खोल दरीत कोसळला. या वळणावर संरक्षक कठडा किंवा मजबूत संरक्षक भिंत नसल्याने अपघाताची तीव्रता वाढल्याचे सांगण्यात येत आहे.
या भीषण अपघातात राहुल ठाकरे आणि प्रीतम प्रधान यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या बाबाराव टेकाम यांचा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. दत्तू मेश्राम, प्रतीक आर. के. आणि यशवंत पाटील यांना दुखापत झाली. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. बिपिन बाभळे यांनी प्राथमिक उपचार केले. दरीतील दगडांवर आदळल्याने तसेच अंगावर दगड आणि टेम्पो पडल्याने काहींना गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे.अपघाताची माहिती भाविकांनी 112 क्रमांकावर दिल्यानंतर गस्तीवर असलेले पोलीस निरीक्षक देविदास चोपडे आणि पोलीस कर्मचारी पवन राऊत यांना घटनेची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने जखमींना दरीतून बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरीत पडलेले मृतदेह बाहेर काढणे आव्हानात्मक ठरले. पोलीस निरीक्षक चोपडे यांनी पत्रकार इलियास बावाणी आणि पत्रकार गोपाल चव्हाण यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात पोहोचविले. शारदा कन्स्ट्रक्शनचे सुपरवायझर श्रीनिवास यांनी तातडीने क्रेन उपलब्ध करून दिल्याने दरीत कोसळलेला टेम्पो बाहेर काढण्यात आला.
ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असताना डॉ. बिपिन बाभळे यांनी बाबाराव टेकाम यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. रुग्णालयातील वैद्यकीय व परिचारिका कर्मचारी तसेच 108 रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने सेवा देत जखमींवर उपचार केले. मृतदेहांचे शवविच्छेदनही करण्यात आले. या मदतकार्यात एस. बी. बोथिंगे, दत्ता पालटवाड, एस. कुंठेकर, आर. श्रीमंगले, पी. आर. जुडे, जी. आर. भोपाळे, अमृता कऱ्हाळे आणि गणेश धुळगंडे यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद घोडके, पोलीस हवालदार सत्यमल मडावी, पोलीस कर्मचारी संघरत्न सोनसळे व पवन राऊत तसेच होमगार्ड एस. पी. भगत आणि मुरकुटे पुढील तपास करीत आहेत.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर माहूर गडावर भाविकांची मोठी वर्दळ असताना घडलेल्या या दुर्घटनेने घाटरस्त्यावरील सुरक्षित प्रवासाचा प्रश्न गंभीर बनला आहे. घाटातील धोकादायक वळणांवर संरक्षक कठडे, मजबूत भिंती, दिशादर्शक फलक आणि रात्रीच्या वेळी वाहनचालकांना सुरक्षितपणे प्रवास करता यावा यासाठी आवश्यक उपाययोजना आहेत की नाहीत, याची संबंधित विभागाने तातडीने पाहणी करणे गरजेचे आहे. नवरात्रोत्सवासाठी हजारो भाविक माहूरला येत असल्याने संभाव्य अपघात टाळण्यासाठी घाटातील धोकादायक ठिकाणांची ओळख पटवून तातडीने सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयामागील घाटातील पहिल्या धोकादायक वळणावर झालेल्या या अपघातात तिघांचा मृत्यू झाला, तर चालकासह अन्य दोघे किरकोळ जखमी झाले. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून घाटरस्त्यावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.





























































