
संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे परिसरात गेल्या काही दिवसांपासून माकडांच्या वाढत्या उपद्रवामुळे ग्रामस्थ आणि शेतकरी त्रस्त झाले होते. माकडांकडून शेतीचे व व्यापारीवर्गाचे मोठे नुकसान केले जात असल्यामुळे या समस्येचा बंदोबस्त करण्यासाठी ग्रामस्थांच्या पुढाकाराने वनविभागाने तत्काळ पावले उचलत दाभोळे येथे माकडे पकडण्यासाठी पिंजरा दाखल केला आहे.
दाभोळे येथील विजय नामदेव गांधी आणि रजनी चिंगळे यांनी या गंभीर समस्येकडे वनविभागाचे लक्ष वेधले होते. त्यांनी संगमेश्वर-देवरुखचे वनपाल सागर गोसावी तसेच दाभोळेच्या वनरक्षक सुप्रिया काळे यांना परिसरातील माकडांच्या वाढत्या उपद्रवामुळे होणाऱ्या नुकसानाची सविस्तर माहिती दिली.
ग्रामस्थांच्या निवेदनाची गंभीर दखल घेत वनविभागाने तातडीने कारवाई करत घटनास्थळी पिंजरा लावण्याचे निर्देश दिले. त्यानुसार वनविभागाच्या पथकाने दाभोळे येथे येऊन पिंजरा लावला. या महत्त्वपूर्ण कारवाईमुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, माकडांमुळे होणारे नुकसान आता काही अंशी थांबण्यास मदत होणार आहे. या प्रसंगी वनविभाग दाभोळेच्या वनरक्षक सुप्रिया काळे, विजय गांधी, साहाय्यक मयुर बावधने, विलास मारुती हिरवे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांच्या या पाठपुराव्याबद्दल परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे.





























































