पोलिस हाडं मोडू शकतात, पण सत्याग्रह मोडू शकत नाहीत; राहुल गांधी यांचा दिल्ली पोलिसांवर हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विद्यार्थ्यांवरील कथित पोलिसी हल्ल्याच्या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यास दिल्ली पोलीस नकार देत असल्याचा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. केरळमधील एका प्रकरणात ‘झिरो एफआयआर’ दाखल करण्यात आला असून, संबंधित अधिकाऱ्यांविरोधात केरळ, राजस्थान आणि न्यायालयांमध्ये कायदेशीर लढा देणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. ‘पोलिस हाडं मोडू शकतात, पण सत्याग्रह मोडू शकत नाहीत,’ अशा शब्दांत राहुल गांधी यांनी पोलिसांच्या कारवाईवर टीका केली.

राहुल गांधी यांनी सोशल मीडिया एक्सवर पोस्ट करून दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केले. दिल्ली पोलिसांनी केरळमधील अथिरा, राजस्थानमधील ऋतू यांच्यासह अनेक तरुणींना मारहाण केल्याचा दावा त्यांनी केला. विद्यार्थ्यांवरील हल्ल्याप्रकरणी तक्रार नोंदवून घेण्यास पोलीस नकार देत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणी आपण केरळचे गृहमंत्री रमेश चेन्निथला आणि राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांच्याशी चर्चा केल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. केरळमध्ये या प्रकरणी झिरो एफआयआर दाखल करण्यात आली आहे. संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात केरळ, राजस्थान आणि न्यायालयांमध्ये सर्व कायदेशीर मार्गांचा अवलंब केला जाईल. दिल्ली पोलिसांच्या कथित दडपशाहीकडे दुर्लक्ष केले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर टीका करताना राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यलढ्यातील ऐतिहासिक घटनेचाही संदर्भ दिला. १९३० मध्ये धरासणा येथे सरोजिनी नायडू यांच्या नेतृत्वाखाली निःशस्त्र सत्याग्रहींनी पोलिसांच्या लाठ्या सहन केल्या; मात्र त्यांनी प्रतिकारासाठी हात उचलला नाही. ही घटना संपूर्ण जगाने पाहिली होती, असे राहुल गांधी यांनी नमूद केले.