Beed Accident News – तुळजापूर दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला; कार-बसच्या धडकेत 5 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात खामगाव–पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील शिंदेवाडी फाट्याजवळ रविवारी सकाळी दहाच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. तुळजापूर दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारची तेलगावकडून येणाऱ्या माजलगाव आगाराच्या बसशी समोरासमोर जोरदार धडक झाली. या दुर्घटनेमुळे माजलगाव परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हुंडाई कार क्रमांक एमएच २६ ए.के. ४२१० ही शिंदेवाडी फाट्यावरील हॉटेल शिवराजसमोर माजलगाव आगाराच्या बसला समोरून धडकली. धडक इतकी भीषण होती की या अपघातात पाच जणांना प्राण गमवावे लागले. मृतांमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. ओमकार महादेव गिरी (वय – २४), गजानन महादेव नामदास (वय – ३८), माऊली गजानन नामदास (वय – ११), सोमनाथ बडे (वय – २३), अनिल आचार्य (वय – ४०) अशी मृतांची नावे आहेत.

खामगाव–पंढरपूर महामार्गावरील संबंधित भागात रस्त्याला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या असून ठिकठिकाणी चढ-उतार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या मार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.