सामना अग्रलेख – होय, रेजिम चेंज होईल!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सत्ता परिवर्तन म्हणजे ‘रेजिम चेंज’ ही संविधानातील एक अटळ कृती आहे. ती होणारच. हा ‘रेजिम चेंज’ 2024 च्या लोकसभा निवडणुकीतच झाला होता, पण ज्ञानेश कुमारसारख्या ‘माफिया’ निवडणूक आयुक्तांना हाताशी धरून मोदी वगैरे लोक सत्तेवर चिकटून बसले. त्यांच्या पापाचा घडा भरला आहे. त्यामुळे ‘तिरंगा’ आंदोलनास विरोध करण्याची अवदसा त्यांना सुचली. या प्रकारामुळे ‘रेजिम चेंज’ला गती मिळाली. भारतात तिरंगा फडकवायला जे विरोध करतात अशा लोकांची सत्ता उलथवून ‘रेजिम चेंज’ करावे लागेल व हा ‘रेजिम चेंज’ अटळ आहे. लोकांनी तसे ठरवले आहे. त्यामुळे मोदी–शहांचे जुलमी ‘रेजिम’ हादरले आहे. संविधानाच्या नावाने खोट्या शपथा घेऊन आता फायदा होणार नाही.

जुलमी राज्यकर्त्यांविरुद्धचे कोणतेही आंदोलन अथवा बंड हे सत्ताबदल करण्यासाठीच असते. भारतीय जनता पक्षानेही देशात याच पद्धतीने एकदोन वेळा सत्ताबदल घडवला, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांना हे कोणी सांगायचे? या सगळ्यांना वाटते की, नरेंद्र मोदी हे पंतप्रधान नसून भारताचे चक्रवर्ती राजे आहेत. ते अमर आहेत. सदैव तेच सत्तेवर राहतील. त्यांना कोण हटवणार? हा असा विचार भारतीय संविधानाच्या विरोधातला आहे. ‘‘होय, आम्हाला ‘रेजिम चेंज’ म्हणजे सत्ताबदल हवा आहे,’’ असे वक्तव्य ज्येष्ठ कायदेपंडित प्रशांत भूषण यांनी करताच भाजपचे वाटाणे तापल्या तव्यावर ताडताड उडू लागले. ‘‘विरोधकांना काही कळते की नाही? पहा, शेवटी त्यांच्या पोटातले ओठावर आले. आंदोलनाच्या आडून त्यांना देशात सत्तापालट करायचा आहे.’’ श्री. फडणवीस यांचे असे बेजबाबदारपणाचे वक्तव्य त्यांचा मेंदू तणावाखाली असल्याचे दर्शवते. सत्ताबदल हवा असे बोलणे व त्यासाठी संघर्ष करणे हे लोकशाहीच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. राज्याची किंवा देशाची सत्ता आम्ही घेणारच, असे अनेक नेते गर्जत असतात, पण भाजपला ते मान्य नाही. निवडणूक आयुक्त हे भाजपचे हरकामे आहेत व भाजप विजयी व्हावा, सत्तेवर यावा म्हणून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी संविधानविरोधी कृत्ये केली आहेत. जनता या माणसाविरुद्ध आंदोलन करत आहे.

गैरमार्गाने सत्तेवर आलेले

सरकार बदलायला हवे, असे आता विरोधक बोलत असतील तर त्यात काय चुकले? लोकशाही मार्गाने आंदोलन करणे हे मोदी-फडणवीस वगैरे लोकांना अराजक वाटत आहे, पण भाजपने आतापर्यंत केलेली सर्व आंदोलने याच पद्धतीची होती. आणीबाणीत त्यांचा जनसंघ जनता पक्षात विलीन झाला होता तो ‘रेजिम चेंज’ करण्यासाठीच. व्ही. पी. सिंग यांनी राजीव गांधींविरोधात बंड पुकारून जनता दल स्थापन केले होते आणि त्या कामी भाजपवाले व्ही. पी. सिंग यांना हवा देत होते. त्यामागचा उद्देश ‘रेजिम चेंज’ करण्याचाच होता. डॉ. मनमोहन सिंग या सभ्य पंतप्रधानांविरुद्ध भाजपने पुकारलेली मोहीम ‘रेजिम चेंज’साठीच होती. विरोधकांचे सत्ताधाऱ्यांविरुद्धचे आंदोलन ‘रेजिम चेंज’ करण्यासाठीच असते व याप्रश्नी जागतिक युद्धे झाली. इराणमधली ‘रेजिम चेंज’ करणे हा प्रे. ट्रम्प यांचा उद्देश होता व त्यासाठी अमेरिकेने शेकडो बॉम्ब इराणवर टाकले. ‘‘आम्हाला इराणमधील ‘रेजिम चेंज’ करायचा आहे,’’ असे प्रे. ट्रम्प वारंवार बोलत राहिले, पण इराणमधील ‘रेजिम चेंज’ करणे प्रे. ट्रम्पना जमले नाही. सध्या भारतातही लोकशाही वाचविण्यासाठी टोकाचा संघर्ष सुरू आहे. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, ‘‘हा खेळ सत्तेची खुर्ची मिळविण्यासाठी आहे.’’ फडणवीस यांनी त्यास खेळ म्हटले. तसलेच

खेळ करून

व निवडणूक आयोगास गुलाम करून फडणवीस वगैरे लोक सत्तेवर आले आहेत ते काही ‘धर्मादाय’ कार्यासाठी नाही. सत्तेवर येऊन त्यांनी बिल्डरांचे राज्य उभे केले. लोकशाहीचे मालक बनण्याचा प्रयत्न केला. अदानी, कम्बोजसारख्या लोकांकडे राज्यातील लुटीचा पैसा वळवला व या लुटीच्या विरोधात जनता रस्त्यावर उतरली तेव्हा त्यांना ते अराजक वाटू लागले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान निर्माण केले त्याबरहुकूम देश चालला पाहिजे याचा साक्षात्कार मोदी-फडणवीस यांना आता झाला. म्हणजे बुडाला आग लागल्यावर त्यांना संविधान आठवले. सत्ता परिवर्तन म्हणजे ‘रेजिम चेंज’ ही संविधानातील एक अटळ कृती आहे. ती होणारच. हा ‘रेजिम चेंज’ 2024 च्या लोकसभा निवडणुकीतच झाला होता, पण ज्ञानेश कुमारसारख्या ‘माफिया’ निवडणूक आयुक्तांना हाताशी धरून मोदी वगैरे लोक सत्तेवर चिकटून बसले. त्यांच्या पापाचा घडा भरला आहे. त्यामुळे ‘तिरंगा’ आंदोलनास विरोध करण्याची अवदसा त्यांना सुचली. या प्रकारामुळे ‘रेजिम चेंज’ला गती मिळाली. भारतात तिरंगा फडकवायला जे विरोध करतात अशा लोकांची सत्ता उलथवून ‘रेजिम चेंज’ करावे लागेल व हा ‘रेजिम चेंज’ अटळ आहे. लोकांनी तसे ठरवले आहे. त्यामुळे मोदी-शहांचे जुलमी ‘रेजिम’ हादरले आहे. संविधानाच्या नावाने खोट्या शपथा घेऊन आता फायदा होणार नाही.