
मुंबईतील वाकोला येथील ‘ओम नमो, सुजलाम सुफलाम को-ऑप. हाऊसिंग सोसायटी’च्या एसआरए प्रकल्पात स्थानिक रहिवाशांची मोठी फसवणूक होत असून राजकीय वरदहस्त लाभलेला बिल्डर आणि भ्रष्ट एसआरए अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा अन्याय सुरू असल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तातडीने हस्तक्षेप करण्याची आणि रहिवाशांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.
खासदार संजय राऊत यांनी पत्रात नमूद केले आहे की, हे रहिवासी मुंबईचे मूळ निवासी असून गेल्या 19 वर्षांपासून हा प्रकल्प प्रलंबित आहे. बिल्डरकडून पोलिसांच्या व एसआरए अधिकाऱ्यांच्या मदतीने बळजबरीने जागा रिकाम्या करून घेतल्या जात आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या स्पष्ट आदेशानंतरही विकासकाची आर्थिक क्षमता न तपासल्यामुळे विकासकाने झोपडपट्टीधारकांच्या नावाने बँकांकडून कर्जे काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
आरटीआय अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार, या परिसराचे बायोमेट्रिक सर्वेक्षणच झालेले नाही. तसेच 23 हजार चौरस मीटर जागेचा कोणताही अधिकृत हिशोब नसून विकासकाने महारेराकडे नोंदणी न करताच काम सुरू ठेवले आहे. 17 जून 2026 रोजी सहाय्यक निबंधकांनी सोसायटीची कार्यकारिणी बरखास्त केली असतानाही 9 सप्टेंबर 2026 रोजी एसआरएच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काढलेली 33/38 ची नोटीस पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
श्रीमान @Dev_Fadnavis जी मुंबईत आपल्या आशिर्वादाने सुरू असलेले बिल्डरराज हे सुद्धा जंगलराज आहे!
वाकोला येथील ओम् नमो सुफलाम सोसायटी च्या गरीब रहिवाशांचा छळ सुरू आहे,
सुप्रीम कोर्टाचे आदेश पाळले जात नाहीत!
हे कायद्याचे राज्य नाही!
जंगल राज आहे!
@PMOIndia
@srabrihanmumbai
@indSupremeCourt— Sanjay Raut (@rautsanjay61) October 19, 2026
मुंबईच्या उभारणीत श्रमिकांचे मोठे योगदान आहे. मात्र, भ्रष्ट बिल्डर आणि एसआरए अधिकारी मुंबईतील भूखंड लाटण्याचे काम करत आहेत. मुख्यमंत्री व प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी फडणवीस यांच्याकडे वाकोल्याच्या रहिवाशांच्या प्रतिनिधींसोबत बैठकीचे आयोजन करून दोषी बिल्डर व अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.




























































