
फ्रान्समध्ये महागाई, वाढता जीवनावश्यक खर्च आणि शिक्षण व्यवस्थेतील खालावलेली स्थिती याविरोधात पुकारण्यात आलेले देशव्यापी आंदोलन अखेर हिंसक झाले आहे. अनेक भागांत शांततेत सुरू असलेल्या या आंदोलनांना अचानक हिंसक वळण लागल्याने पॅरिससह देशातील प्रमुख शहरांत मोठी जाळपोळ, दुकानांची लूट आणि पोलिसांशी जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. या स्फोटक आणि गंभीर परिस्थितीवर इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना थेट इशारा दिला आहे.
इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची यांनी सोशल मीडियावर एक प्रक्षोभक पोस्ट शेअर करत फ्रान्सच्या अंतर्गत मुद्द्यांवर भर दिला आहे. त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, “अध्यक्ष महोदय, फ्रान्सच्या भविष्याचा आवाज ऐका.” जेव्हा मॅक्रॉन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना आश्वासन दिले होते की, इराणी लोकांविरुद्ध होणाऱ्या अत्याचारांचे ते स्वागत करतात, तेव्हा त्यांनी स्वतःवर मोठे संकट ओढवून घेतले आहे. त्यांच्यासारख्या नेत्यांनी भडकवलेल्या युद्धासाठी आता इतरांना दोष देणे फार उशीर झालेला आहे. आज फ्रेंच जनता संपूर्ण बदलाची मागणी करत असून, यात सभास्वातंत्र्याचाही समावेश आहे, असे सांगत त्यांनी मॅक्रॉन यांना चिमटे काढले आहेत.
दुसरीकडे, देशातील या अशांत आणि चिंताजनक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी रविवारी नागरिकांना शांतता राखण्याचे सलोख्याचे आवाहन केले. राष्ट्राला उद्देशून केलेल्या विशेष दूरचित्रवाणी भाषणात त्यांनी स्पष्ट शब्दांत बजावले की, या हिंसाचाराचे समर्थन कशानेही होऊ शकत नाही आणि त्याला क्षमाही करता येणार नाही. फ्रेंच नागरिक आपल्याच देशाविरुद्ध अशी विनाशाची कृत्ये कशी करू शकतात, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्यांच्या मागण्या आणि उपद्रव व हिंसाचार करणाऱ्यांची कृत्ये यांची कोणीही गल्लत करू नये, असे आवाहन त्यांनी केले. फ्रान्समध्ये सध्या राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आलेली नाही, परंतु कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गरज भासल्यास विशिष्ट निदर्शनांवर बंदी घालण्याचे पूर्ण अधिकार स्थानिक प्रशासनाला असतील, असा इशारा त्यांनी दिला.
फ्रान्समधील या वणव्यात आणि देशव्यापी आंदोलनांदरम्यान आतापर्यंत जवळपास 2 हजार 400 लोकांना पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या शनिवारी देशभरातील विविध शहरांत पाच लाखांहून अधिक नागरिक रस्त्यांवर उतरले होते. यातील बहुतांश निदर्शने सुरुवातीला शांततापूर्ण होती, मात्र काही उपद्रवी घटकांनी मोर्चान्ना गालबोट लावत दुकाने लुटली, पोलिसांची वाहने पेटवून दिली आणि सरकारी इमारतींना लक्ष केले. या तीव्र संघर्षामुळे फ्रान्समधील राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे.


























































