बलुचिस्तानमध्ये लष्कराच्या काफिलावर आयईडी स्फोट; 12 पाकिस्तानी सैनिक ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानविरोधीत सातत्याने कुरापती करणाऱ्या आणि दहशतवादाला आश्रय देणाऱ्या पाकिस्तानला अंतर्गत सुरक्षा आघाडीवर मोठे धक्के बसू लागले आहेत. पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर आणि बलुचिस्तान प्रांतात शनिवारी रात्री उशिरा निर्माण झालेल्या अत्यंत स्फोटक आणि भयंकर परिस्थितीमुळे खळबळ उडाली आहे. बलुचिस्तानमधील ग्वादर जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या पसनी भागात पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्याला लक्ष्य करून एक भीषण रिमोट कंट्रोल आयईडी (IED) स्फोट घडवून आणण्यात आला. या प्राणघातक हल्ल्यात तब्बल 12 पाकिस्तानी सैनिकांचा जागीच मृत्यू झाला असून, यामुळे पाकिस्तानी लष्कराच्या पायाखालची जमीन सरकली आहे.

गेल्या काही काळापासून बलुचिस्तान प्रांतामध्ये पाकिस्तानी लष्कराच्या विरोधात असंतोष सातत्याने वाढताना दिसत असून, बंडखोरांकडून लष्कराला वेळोवेळी जोरदार प्रत्त्युत्तर दिले जात आहे. शनिवारी रात्री जेव्हा पाकिस्तानी सैन्याचा ताफा पसनी भागातून मार्गस्थ होत होता, तेव्हा आधीच पेरून ठेवलेल्या रिमोट कंट्रोल IED बॉम्बचा वापर करून हा घातपात घडवण्यात आला. या शक्तिशाली स्फोटात लष्कराची वाहने पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून, मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याने पाकिस्तानी लष्करी वर्तुळात एकच दहशत पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणांनी तात्काळ संपूर्ण परिसर कॉम्बिंग ऑपरेशन राबवत आपल्या ताब्यात घेतला असून, जखमी सैनिकांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे. हिंदुस्थानविरोधात कारवाया करणाऱ्या पाकिस्तानला आता स्वतःच्याच घरादारात अशांततेचा सामना करावा लागत असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरही या हल्ल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.