पेरलेले सोयाबीन बियाणे उगवलेच नाही, तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार कराव्यात; विवेक कोल्हे यांचे आवाहन

यंदा खरीप हंगामात कोपरगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली. परंतु पेरलेले सोयाबीनचे बियाणे उगवलेच नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. पेरलेले सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्यामुळे नुकसान भरपाई मिळण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी याबाबत कोपरगावच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात लेखी स्वरुपात तक्रार करून त्याची पोहोच घ्यावी, असे आवाहन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केले आहे.

कोपरगाव तालुक्यातील बऱ्याच ठिकाणच्या शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि विवेक कोल्हे यांच्याकडे मांडल्या होत्या. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी चांगल्या उत्पन्नाच्या आशेने भरमसाठ खर्च करून बाजारातून सोयाबीनचे बियाणे खरेदी करून पेरणी केली. पेरण्यानंतर बियाणे नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्यानंतर शासनाने नेमलेल्या समितीकडून संबंधित शेतकऱ्यांच्या शेतात स्थळपाहणी व पंचनामे केले जातात. या समितीने अहवाल दिल्यानंतर सदर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय होतो.

यासंदर्भात शासनाने पाहणीसाठी एक समिती गठीत केली आहे. संगमनेरचे उपविभागीय कृषी अधिकारी या समितीचे अध्यक्ष असून, कोपरगाव पंचायत समितीचे कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, महाबीजचे प्रतिनिधी, बियाणे कंपनीचे अधिकारी यांचा या समितीमध्ये समावेश आहे. ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष जाऊन ही समिती पाहणी करून पंचनामे करणार आहे व शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेणार आहेत. शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार कृषी विभागाने त्वरित पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. तसेच बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कपन्यांची चौकशी प्रशासनाने करावी, अशी मागणी विवेक कोल्हे यांनी केली आहे.