दहा वर्षांत अच्छे दिन आले नाहीत, आता रस्त्यावर उतरण्याची वेळ! आदित्य ठाकरे यांचा घणाघात

दहा वर्षांपूर्वी सत्तेत येण्यासाठी जनतेला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून सत्ता बळकावली. या गोष्टीला येत्या मे महिन्यात दहा वर्षे पूर्ण होतील. मात्र देशाला ‘अच्छे दिन’ काही दिसले नाहीत. देशातील भाजपप्रणीत राज्यांमध्येही प्रचंड अस्थिरता आहे. शेतकरी, तरुण, महिला आणि गोरगरीब वाऱयावर आहेत. हक्काच्या मागण्यांसाठी लोकांना आंदोलने करावी लागत आहेत. ही आंदोलने चिरडण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू आहेत. त्यामुळे आता जनतेला मैदानात उतरून, रस्त्यावर उतरून लढा द्यायची वेळ आल्याचा घणाघात आज शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला.

‘महा निष्ठा, महा न्याय… महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत आदित्य ठाकरे यांनी आज शिवडी येथे आयोजित जनसंवाद मेळाव्यात हजारो जनसमुदायाला मार्गदर्शन केले. देशातील अस्थिरतेबद्दल गंभीर चिंता व्यक्त करताना त्यांनी अन्यायाविरोधात खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन उपस्थितांना केले. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न असलेल्या निर्णयाला जम्मू-कश्मीरमधून 370 कलम हटवण्याला शिवसेनेने पाठिंबा दिला, मात्र यानंतर लडाखची विभागणी करण्यात आली. या लडाखला आता केंद्रशासित राहायचे नाही, तर त्यांना आता स्वतंत्र विधानसभा, मुख्यमंत्री हवा आहे. लडाखमध्ये स्वतंत्र विधानसभेसाठी चाळीस हजार लोकांचा मोर्चा निघाला, मात्र याकडे पहायला केंद्र सरकारला वेळ नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. हे केंद्र सरकार कोणाचेच नाही. यावेळी शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, आमदार अजय चौधरी, सुनील शिंदे, माजी आमदार दगडू सकपाळ, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, माजी महापौर किशोरी पेडणेकर, स्नेहल आंबेकर, माजी उपमहापौर हेमांगी वरळीकर, साईनाथ दुर्गे, संतोष शिंदे, मनोज जामसुदकर, अरुण दुधवडकर, रमाकांत रहाटे, लता रहाटे, सुधीर साळवी आदी उपस्थित होते.

महिलांचा अवमान करणारे सरकार चालू देणार नाही
आज राज्यात दिशाहीन सरकार आहे. महिला सुरक्षित नाही. बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींना सोडल्यानंतर भाजप प्रचारासाठी फिरवत आहे. स्त्र्ायांचा अपमान करणारे, अत्याचार करणारे मंत्रीपदावर आहेत. परिणामी जनता संतप्त आहे. त्यामुळे अबकी बार 400 पार म्हणणारे 250 तरी गाठणार का, असा सवालही त्यांनी यावेळी केला. आमच्या सरकारच्या काळात अत्याचार करणाऱया मंत्र्याला गेट आऊट करण्यात आले. बलात्काऱयांना फाशी देणारे आमचे हिंदुत्व असल्याचे सांगतानाच महिलांचा अवमान करणारे सरकार चालू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

दाग अच्छे है, वॉशिंग पावडर भाजपा
तुम्ही भ्रष्टाचारी, खुनी, दरोडेखोर असाल तर भाजपमध्ये प्रवेश देऊन पद मिळते. दाग अच्छे है, वॉशिंग पावडर भाजपा, अशी स्थिती आता झाली आहे, असा टोला त्यांनी लगावला. अशा वेळी भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांवर होत असलेल्या अन्यायाबद्दल वाईट वाटत असल्याचे ते म्हणाले. सध्या काँग्रेसयुक्त भाजप व्हायला लागलेय. काँग्रेस स्वच्छ झालीय. त्यामुळे राहुल गांधी यांना सांगेन की तुम्हीदेखील भाजपमध्ये जा.

ईडी, सीबीआय येतील घाबरायचे नाही
मिंध्यांचे दोन दिवसीय शिबीर पार पडले. यावेळी कपडे पांढरे घातले असले तरी त्यांचे काळे मन महाराष्ट्र स्वीकारणार नाही, असेही ते म्हणाले. यांचा मुंबई लुटायचा प्रयत्न राहील. मिंधे-भाजप समाजात विष पेरण्याचा प्रयत्न करतील, जातीजातीत भांडणे लावतील, मात्र मुंबईकर म्हणून एकत्र राहणार की विषाला बळी पडणार, असा सवालही त्यांनी केला. ईडी, सीबीआय आले तरी घाबरायचे नाही, कणखरपणे लढत रहायचे असे आवाहनही त्यांनी केले. शिवसेनेची धगधगती मशाल महाराष्ट्रातील अंधकार दूर करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पेपर फोडला तर दहा वर्षे शिक्षा करा!
मुंबईत नोकरीच्या संधी होत्या. यासाठी देशभरातून तरुण या ठिकाणी येतो. मात्र नोकऱ्याच नसल्याने तरुणांनी जायचे तरी कुठे हाच प्रश्न पडलाय. परीक्षांमध्ये होणारे घोळ टाळण्यासाठी पेपर पह्डला तर दहा वर्षे सजा असा कायदा करा अशी मागणीही त्यांनी केली. 2024 मध्ये आमचे सरकार आल्यावर असा कायदा करू असे आश्वासनही त्यांनी दिले.

हे तर रावणराज्य!
शेतीमध्ये क्रांती घडवणाऱया डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचा सरकार ‘भारतरत्न’ देऊन गौरव करते, मात्र तेच शेतकरी आपल्या हक्कांसाठी लढत असताना त्यांचे आंदोलन चिरडून टाकत असल्याबद्दल आदित्य ठाकरे यांनी संतापही व्यक्त केला. पंजाब, हरयाणा, कर्नाटक केंद्राकडे आपल्या हक्काच्या, जीएसटी परताव्याच्या पैशासाठी वारंवार पाठपुरावा, आंदोलन करीत असताना याकडे दुर्लक्ष केले जात आहे. कर्नाटकच्या डी. के. शिवमूर्ती यांनी जीएसटीच्या पैशासाठी दिल्लीत आंदोलन केले. आमच्या विकासासाठी आमचा पैसा आम्हाला द्या, अशी मागणी केली जात आहे, मात्र केंद्र लक्ष देत नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. मणिपूर जळतेय. त्यामुळे हे रामराज्य नाही तर ‘रावण राज्य’ असल्याचे वाटप असल्याचा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला.