Arvind Kejriwal News – माफीच्या साक्षीदाराने भाजपला इलेक्टोरल बॉण्डच्या माध्यमातून 59 कोटी दिले; ‘आप’चा गंभीर आरोप

कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली असून त्यांना 6 दिवसांची ईडी कोठडी ठोठावण्यात आली आहे. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत तपास यंत्रणांनी केलेल्या या कारवाईमुळे ‘आप’ आक्रमक झाली असून देशभरात निदर्शने सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आप नेत्या आणि कॅबिनेट मंत्री आतिषी यांनी पत्रकार परिषद घेत भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवला. कथित मद्य घोटाळा प्रकरणातील माफीच्या साक्षीदाराने भाजपला इलेक्टोरल बॉण्डच्या माध्यमातून 59 कोटी रुपये दिल्या आरोप आतिशी यांनी केला आहे.

कथित मद्य घोटाळा प्रकरणात ईडीला आतापर्यंत ‘मनी ट्रेल’ (आर्थिक व्यवहार)चा एक पैसाही मिळालेला नाही. हीच बाब सर्वोच्च न्यायालयानेही ईडीला विचारली असून आपल्या आदेशातही याचा उल्लेख केला आहे. अरविंद केजरीवाल यांना दोन दिवसांपूर्वी कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली. शरदचंद्र रेड्डी नावाच्या व्यक्तीच्या साक्षीवरून ही अटक करण्यात आली. शरदचंद्र रेड्डी औषधं बनवणाऱ्या अरबिंदो फार्मा या कंपनीचे मालक आहेत असून त्याच्या आणखीही कंपन्या आहेत. 9 नोव्हेंबर 2022 रोजी ईडीने समन्स पाठवून त्याची चौकशी केली.

ईडीच्या चौकशीदरम्यान त्याने आपण अरविंद केजरीवाल यांना कधी भेटलोही नाही आणि त्यांच्याशी कधी संवादही साधला नाही म्हटले. दुसऱ्याच दिवशी शरदचंद्र रेड्डी याला ईडीने अटक केली. त्यानंतर अनेक महिने तुरुंगात काढल्यानंतर रेड्डीने आपले जबाब बदलला. मी केजरीवाल यांना भेटलो, कथित मद्य घोटाळ्यावर चर्चाही झाल्याचे म्हणतात रेड्डीला जामीनही मंजूर मिळतो. पण हा फक्त जबाब असून ‘मनी ट्रेल’ कुठे आहे? भाजप आणि त्यांचा उजवा हात ईडी वारंवार मनी ट्रेलचा उल्लेख करत आहे, पण मनी ट्रेल आहे कुठे? असा सवाल करत आतिशी यांनी रेड्डी याने इलेक्टोरल बॉण्डच्या माध्यमातून भाजपला पैसे दिल्याचा आरोप केला.

कथित मद्य धोरण प्रकरण सुरू असतानाच अरबिंदा फार्मा, एपीएल हेल्थकेअर आणि यूजिया फार्माचा मालक आणि मद्य व्यवसायिक शरदचंद्र रेड्डी याने साडे चार कोटी रुपयांचे इलेक्टोरल बॉण्ड भाजपच्या खात्यात जमा केले. याप्रकरणी अटक झाल्यानंतर त्याने आणखी 55 कोटी असे असून 59 कोटी रुपये भाजपला दिले. ‘मनी ट्रेल’ इथे झाला असून हे पैसे भाजपच्या खात्यात गेले आहेत. त्यामुळे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांना अटक झाली पाहिजे, अशी मागणीही आतिशी यांनी केली.