शरद पवारांच्या पाया पडलो आणि आशीर्वाद घेतले- प्रफुल्ल पटेल

अजित पवार यांच्यासह त्यांच्या गटातील मंत्र्यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे एक तास शरद पवार यांच्याशी त्यांनी चर्चा केली. यावेळी शरद पवार यांच्या पाय पडून त्यांचे आशीर्वाद घेतल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.

शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधला. प्रफुल्ल पटेल म्हणाले की, आमचे सर्वांचे दैवत, आमचे नेते, आदरणीय शरद पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही आलो आहोत. भेट पूर्वनियोजित नसल्याने त्यांची वेळ न मागता आम्ही त्यांना थेट भेटायला आलो. शरद पवार हे वाय बी चव्हाण सेंटरला आल्याचं कळालं होतं. त्यामुळे आम्ही तातडीने इथे आलो. यावेळी मी शरद पवारांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद मागितले. आमच्या मनात त्यांच्यासाठी आदर आहे.

यावर शरद पवारांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता आमचं म्हणणं ऐकून घेतलं, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले. यावेळी अजित पवार गटातील सर्व मंत्री हजर होते.