शरद पवार यांचा चांगुलपणाचा फायदा घेणे योग्य नाही; अजित पवार गट आणि शरद पवार भेटीवर विद्या चव्हाण यांची प्रतिक्रिया

अजित पवार यांच्यासह त्यांच्या गटातील मंत्र्यांनी आणि नेत्यांनी रविवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर सोमवारी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पुन्हा अजित पवार गटाने शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. या भेटीमुळे शरद पवार आपला निर्णय बदलणार का, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनीही महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

विद्या चव्हाण म्हणाल्या की, शरद पवारांनी याचा खुलासा केला आहे की ते भाजपसोबत कधीही जाणार नाही. आपल्याला संघर्ष करायचा आहे, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. जयंत पाटील यांनीही याबाबतचे मत स्पष्ट केले आहे. आता कोणत्याही परिस्थितीत समेट होणार नाही. आम्ही भाजपसोबत जाणार नाही, हे स्पष्ट असतानाही शरद पवार साहेबांना पुन्हा पुन्हा भेटायचं म्हणजे पवार साहेबांच्या चांगुलपणाचा फायदा घ्यायचा, हे बरोबर नाही, अशी प्रतिक्रिया विद्या चव्हाण यांनी दिली आहे.

विद्या चव्हाण पुढे म्हणाल्या की, शरद पवार यांना अशाप्रकारे त्रास देणे बरोबर नाही. तुमच्या हृदयात पवार साहेब असते, तर तुम्ही असा मार्ग निवडलाच नसता. पवार साहेबांच्या नावावर सगळे आमदार निवडून आले आहेत. त्यांनी आपल्या हृदयातून पवार साहेबांना काढून टाकले आणि मोदींची प्रतिमा तयार केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत शरद पवार कधीही जाणार नाही. सर्वधर्म समभाव मानणारे शरद पवार मोदींसोबत जाऊ शकत नाही हे माहीत असताना त्यांना भेटायला जाणे हे बरोबर नाही, असेही विद्या चव्हाण म्हणाल्या.