आमच्या जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने पार पाडू; नवीन वर्षात अजित पवार यांचा संकल्प

सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. नववर्षाच्या निमित्ताने अनेक जण विविध संकल्प करत असतात. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही नववर्षानिमित्त संकल्प केला आहे. याबाबत त्यांनी एका वृत्तवाहिनीला महिती दिला. तसेच राज्यातील जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

2022 हे वर्ष आमच्यासाठी समाधानकारक गेले नाही, असे अजित पवार यांनी सांगितले. पहिले सहा महिने ठिक गेले. मात्र, शेवटच्या सहा महिन्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. अशा घटना घडत असतात. लोकशाहीत जे प्रसंग समोर येतात त्याचा सामना करण्याचे काम राजकीय नेत्यांना करावे लागते. त्यामुळे आता विरोधी पक्षाची जबाबदारी आमच्यावर आहे, येत्या वर्षात आम्ही ती योग्य पद्धतीने पार पाडू, असे अजित पवार म्हणाले. आमच्या जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने पार पाडण्याचा आमचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.

आम्ही कोणीही गोष्टी राजकीय दृष्ट्या न बघता ज्यात महाराष्ट्राचं हित असेल, त्याला प्राधान्य देतो. राज्याच्या हिताच्या गोष्टीला आम्ही विरोध अजिबात करणार नाही. ज्या गोष्टी चुकीच्या होतील, त्या गोष्टी आम्ही सत्ताधाऱ्यांच्या लक्षात आणून देऊ, असेही ते म्हणाले. तसेच येत्या वर्षात महाराष्ट्रावर कोणतंही संकट येऊ नये, कोरोना परत येऊ नये, यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करतो, असेही ते म्हणाले.

नवीन वर्षातील संकल्पाबाबत ते म्हणाले की, नवीन वर्ष येत असतात. आम्ही आमच्या पद्धतीने पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करू. आमच्याकडून कोणतीही चूक होऊ न देण्याचा निश्चय आम्ही करू. तसेच आपल्या सद् विवेक बुद्धीला धरून ज्या गोष्टी करता येईल, त्या गोष्टी करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे ते म्हणाले. नवीन वर्ष सर्वांना सुख-समाधानाचं आणि भरभराटीचं जावो, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.