
भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय परिसरातील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे खुल्या नाटय़गृहाचे नूतनीकरण करून बंदिस्त नाटय़गृह बांधण्यात आले आहे. या नाटय़गृहाचा पडदा शुक्रवारी उघडला. नाटय़कलारसिकांना आता 761 आसनक्षमतेचे सुसज्ज वातानुपूलित बंदिस्त नाटय़गृह उपलब्ध झाले आहे.
2021 साली नाटय़गृहाचे काम हाती घेण्यात आले होते. ते पूर्ण झाल्यावर नाटय़गृह काही काळ रसिकांसाठी खुले करण्यात आले होते. एकप्रकारे त्याचे उद्घाटन झाले होते. मात्र आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुन्हा नाटय़गृहाचे लोकार्पण करण्यात आले. नाटय़गृहाचा रंगमच सुरुवातीला नाटय़प्रयोगांसाठी अपुरा पडत होता. त्यामुळे महापालिकेने त्याचे 2021 साली नूतनीकरण केले. त्रुटी दूर झाल्यानंतर आता हे नाटय़गृह सज्ज झाले आहे. लोकार्पणप्रसंगी महापौर रितू तावडे, महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
– 761 आसने असलेल्या या नाटय़गृहासह भव्य रंगमंच, आधुनिक अकाॅस्टिक साऊंड सिस्टम, पुश बॅक खुर्च्या, प्रकाशयोजना, ग्रीन रूम, पुरेशी मोकळी जागा सोडण्यात आली आहे.
– तळघरात सुमारे 32 वाहने उभी करण्याची क्षमता
पहिल्या मजल्यावर प्रेक्षकांसाठी उपाहारगृह
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मृतिदालन साकारण्यात आले असून त्यामध्ये अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य, सुभाषिते, लावणी, गाणी, शाहिरी प्रदर्शित करण्यात आली आहेत.
गिरणगाव म्हणून ओळखल्या जाणाऱया लालबाग, काळाचौकी, माझगाव, परळ या मराठी लोकवस्तीत एकही नाटय़गृह नव्हते. दामोदर नाटय़गृहही पाडण्यात आले आहे. त्यामुळे या भागातील नाटय़रसिकांना हक्काचे नाटय़गृह उपलब्ध झाले आहे.





























































