पाऊलखुणा – बौद्ध तीर्थक्षेत्र धौली

>> आशुतोष बापट

बौद्ध धर्माचा उदय इ.स. पूर्व 6 व्या शतकात मगध म्हणजे सध्याच्या बिहारमध्ये झाला आणि अर्थातच मगधला लागूनच असलेल्या तत्कालीन कलिंग देशात म्हणजेच ओडिशात त्याचा मोठय़ा प्रमाणावर प्रसार झाला. कलिंग देशाचा मगधशी व्यापार चालू होताच. त्याचबरोबर बौद्ध धर्म ओडिशामध्ये पोचला. पाली ग्रंथानुसार तापसू आणि भल्लिका हे दोन ओडिशाचे व्यापारी सर्वप्रथम बौद्ध धर्माचे अनुयायी झाले असे समजले जाते, परंतु बौद्ध धर्माचा जणू पुनर्जन्म आणि मोठय़ा प्रमाणावर प्रचार आणि प्रसार होण्यासाठी एक महाभयानक युद्ध कारणीभूत ठरलं. मगध या प्रचंड साम्राज्याचा सम्राट अशोक याने कलिंग देश जिंकून घेण्यासाठी स्वारी केली आणि ते युद्ध हे पुढे अशोकाचे मनपरिवर्तन होण्यास कारणीभूत ठरले. त्यानंतर बौद्ध धर्मातील हीनयान, महायान, वज्रयान, कालचक्रयान आणि सहजयान हे सर्व पंथ मोठय़ा प्रमाणात ओडिशामध्ये विकसित झाले. इ.स.च्या 10 व्या शतकातील भौमकार राजवटीमध्ये तर बौद्ध धर्म ओडिशामध्ये उत्कर्षाला पोहोचला होता. ओडिशा प्रांत हा बुद्धाच्या शिकवणीशी, त्याच्या तत्त्वज्ञानाशी निगडित राहिलेला आहे. ओडिशामधली उदयगिरी-ललितगिरी-रत्नगिरी ही तीन बौद्ध संप्रदायाच्या मठांची स्थाने खूप महत्त्वाची आहेत. तिथे असलेल्या बौद्ध मठांचे, काम्य स्तूपांचे अस्तित्व प्राचीन बौद्ध धर्माची इथे रुजलेली पाळेमुळे यांचे दर्शन घडवतात.

चिनी प्रवासी ह्युआन च्वांग याने आपल्या रोजनिशीमध्ये लिहून ठेवलेल्या नोंदींवरून असे समजते की, प्राचीन कलिंग देशात इ.स.च्या 7 व्या शतकात जवळ जवळ शंभरहून अधिक बौद्ध मठ अस्तित्वात होते. हे मठ म्हणजे बौद्ध धर्माची शिकवण देणारी केंद्रेच होती. त्यांची नावे पु-सी-पो-की-ली आणि पो-लो-मो-लो-की-ली अशी ह्युआन च्वांगने नोंदवून ठेवली आहेत. ओडिशामध्ये आपल्याला बौद्ध स्थापत्य हे स्तूप, चैत्य, विहार आणि भल्यामोठय़ा बुद्धमूर्तीद्वारे आजही पाहता येते. धौली हे त्यातलेच एक ठिकाण.

भुवनेश्वरच्या दक्षिणेला 8 किलोमीटरवर दया नदी ओलांडून गेले की, समोर दिसते धौली टेकडी. मगध देशाचा सम्राट अशोक याने कलिंग देशावर स्वारी केली आणि मग जे घनघोर युद्ध झाले ते याच धौली टेकडीच्या परिसरात. लाखो लोकांची आहुती या युद्धात पडली, रक्ताचे पाट वाहिले. दया नदी ही या रक्तपातामुळे लालेलाल होऊन वाहू लागली. ही गोष्ट इसवी सन पूर्व 261 सालची आहे. सम्राट अशोकाने कलिंगावर विजय मिळवला खरा, पण तो हा सर्व विध्वंस पाहून कमालीचा उद्विग्न झाला, अंतर्मुख झाला. त्याच्या आयुष्याला वळण देणारे हे युद्ध ठरले. त्याने हिंसेच्या मार्गाचा त्याग केला, दिग्विजयाची आकांक्षा सोडून दिली आणि तो धर्मविजयाकडे आकर्षित झाला. शांतीचा संदेश देणाऱया गौतम बुद्धाचा मार्ग त्याने अनुसरला. बुद्धवचने आणि एकूणच बुद्धाच्या जीवनाकडे, त्याच्या विचारसरणीकडे तो आकृष्ट झाला.

सम्राट अशोकाचे हृदयपरिवर्तन ज्या ठिकाणी झाले तीच ही धौली टेकडी. या टेकडीवर एका प्रचंड पाषाणशिलेवर एक भलामोठा हत्ती कोरलेला आहे. अगदी लांबूनसुद्धा हा हत्ती आपल्या नजरेस पडतो. ओडिशामधील हे सर्वात प्राचीन शिल्प समजले जाते. बुद्धजन्माच्या आधी गौतम बुद्धाच्या आईला स्वप्नात एक हत्ती तिच्या पोटात प्रवेश करतो आहे असे दिसले होते. त्यामुळेच बौद्ध धर्मात हत्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच हत्तीच्या खाली पाषाणशिलेवर सम्राट अशोकाच्या 11 आज्ञा कोरलेल्या आहेत. आपली प्रजा म्हणजे माझे सुपुत्रच आहेत, असे तो या ठिकाणी नमूद करतो. तसेच आपल्या अधिकाऱयांनी निपक्षपातीपणे कारभार करावा अशा सूचनादेखील तो या शिलालेखातून देतो.

धौली टेकडीच्या माथ्यावर सन 1972 साली जपान बुद्ध संघ आणि कलिंग निप्पॉन बुद्ध संघ यांच्या सहकार्याने एक भव्यदिव्य शांती स्तूप उभारला आहे. शांतीचा रंग पांढरा. या संपूर्ण शांती स्तूपाला पांढरा रंग दिलेला आहे. दुमजली असलेल्या या स्तूपाला दोन बाजूंनी प्रवेशद्वारे केलेली आहेत. स्तूपावर पाच छत्रावली असून त्या जणू काही बौद्ध धर्माच्या पंचशील तत्त्वांचेच प्रतिनिधित्व करतात. स्तूपावरील शिल्पपटांवर बुद्धाच्या पावलांचे ठसे तसेच बोधीवृक्षाचे अंकन केलेले आहे. त्याचप्रमाणे तिथे एक शिल्प असून त्यात सम्राट अशोक आपली तलवार गौतम बुद्धाच्या पायाशी ठेवताना दाखवले आहे. हिंसेचा मार्ग सोडून मी आता अहिंसेचे, बौद्ध तत्त्वज्ञानाच्या प्रसाराचे काम करीन असेच जणू त्या शिल्पातून सूचित करायचे असावे. या शांती स्तूपाच्याच जवळ एक बौद्ध मठ असून त्याला सद्धर्म विहार मठ असे म्हणतात. अनेक बौद्ध धर्माचे अनुयायी या ठिकाणी प्रार्थनेसाठी एकत्र जमतात. धौली टेकडीवर एक धवलेश्वर महादेवाचे मंदिर असून महाशिवरात्रीला इथे मोठा उत्सव साजरा केला जातो. हिंदू धर्मीयांबरोबरच बौद्ध धर्मीय मंडळीसुद्धा या वेळी या मंदिरात येतात.

धौली इथे जाण्यासाठी भुवनेश्वरला जायला जेमतेम अर्धा तास लागतो. धौलीला आता लाईट आणि साऊंड शो सुरू केला आहे. थ्री डी तंत्रज्ञान वापरून केलेला हा लाईट आणि साऊंड शो केवळ अफलातून आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक चित्रविचित्र रचना करून आपल्या समोर इतिहास जिवंत करून दाखवतात. हा शो अगदी न चुकता बघायला हवा. ओडिशा म्हणजे जरी भुवनेश्वर-पुरी-कोणार्क हे त्रिकूट डोक्यात बसले असले तरीही याच्या पलीकडेसुद्धा खूप मोठा ओडिशा बघण्यासारखा, अनुभवण्यासारखा आहे. धौली हे त्यातलेच एक ठिकाण.

[email protected]