ठसा – शंकरबाबा पापळकर

>> महेश उपदेव

अनाथांचे नाथ म्हणून सुप्रसिद्ध असलेले ज्येष्ठ समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांना मध्यंतरी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. अमरावती जिह्यातील वझ्झर येथे स्वर्गीय अंबादास पंत बालगृहाच्या माध्यमातून अंध, अपंग तसेच पूर्णतः गतिमंद असलेल्या 125 मुलांचा सांभाळ शंकरबाबा करत असून त्यांना त्यांनी स्वतःचे नाव देऊन ओळख दिली आहे. राज्यभरातून विविध ठिकाणी सापडलेल्या गतिमंद बालकांचा स्वीकार करून त्यांच्या पुनर्वसनासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. गतिमंद, अपंग, अंध मुलांच्या पुनर्वसनासाठी 1992 पासून त्यांचे सातत्याने कार्य सुरू आहे. शंकरबाबांचा हा प्रवास विलक्षण प्रेरणादायी आहे. हा माणूस वयोमानाने 81 वर्षांच्या आसपास असेल, पण त्यांची धडाडी तारुण्यसुलभ आहे. अफाट जनसंपर्क, धडपडण्याची प्रचंड उमेद आणि हे सारे टिकावे, वाढावे म्हणून जिभेवर साखर ठेवण्याची वृत्ती. त्यांचा हा प्रवास विदर्भातील अनेक जण जवळून बघत आहेत. अमरावतीत गाडगेबाबांच्या समाधी मंदिराजवळ तुकाराम पाटील नावाची दुमजली एक चाळ होती. तिच्या वरच्या माळय़ावर पापळकरांचे कार्यालय होते. अत्यंत साधे आणि आपुलकी जाणवू देणारे. ‘देवकीनंदन गोपाला’ या मासिकाचे शंकरराव पापळकर संपादक होते. हे मासिक गाडगेबाबांच्या विचारांचा पुरस्कार करणारे होते. पत्रकार शंकरराव पापळकर ते शंकरबाबा पापळकर हे व्यक्तिमत्व एका विद्यापीठापेक्षा कमी नाही. बालसुधारगृहातून पुन्हा बाहेर पडणाऱया बेवारस दिव्यांग मुलामुलींचे जीवन वाचवा, अशी हाक शंकरराव पापळकर यांनी दिली आणि दिव्यांगांचे नवे आयुष्य जगापुढे आले. मागील 32 वर्षे पापळकर वझ्झरच्या बालसुधारगृहातून लहान मुलामुलींचे संगोपन करतात. या बालसुधारगृहातील मुलामुलींची लग्ने लावून त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्याचा ध्यास त्यांनी घेतला. साहजिकच शंकरराव पापळकर ही व्यक्ती ‘शंकरबाबा’ म्हणून लौकिकास पात्र ठरली. समाजाच्या ढोंगीपणाला नाकारून त्यातील चांगुलपणा शोधून शंकरबाबांनी आजवर अनेक अनाथ दिव्यांग मुलामुलींची लग्ने लावली. त्या सर्वांची आडनावे पापळकर आणि वडिलांचे नाव शंकर आहे.

बाबांच्या सुधारगृहात असलेली सारीच मुले-मुली अनाथ आहेत. कुठे मंदिरात, रेल्वे-बस स्थानकांवर ही दिव्यांग मुले एक-दोन वर्षांची असताना सापडली. हातच्या फोडाप्रमाणे त्यांच्यावर माया लावल्यानंतर ती 18 वर्षांची झाली की, त्यांना बाहेर काढा, असा संवेदना बोथट असलेला सरकारी नियम आहे. 18 वर्षांची तरुण मुलगी मग कुठे जात असेल? हा प्रश्न जिव्हारी लागणारा आहे. समाज अशांसाठी किती सहाय्यभूत ठरतो? किंवा परिस्थितीला शरण जाऊन मग ही तरुण मुलगी नेमका कोणता मार्ग शोधत असेल? उत्तरालाच अनाथ करणारे हे सारे प्रश्न. मागील 20 वर्षांपासून शंकरबाबा मुख्यमंत्री, राज्य व केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री, सामाजिक न्याय विभागाच्या झाडून सर्व प्रशासकीय अधिकाऱयांना भेटले. त्यांना या प्रश्नाची भीषणता समजावून सांगितली. नक्की काहीतरी करू, या बिनबुडाच्या उत्तराने शंकरबाबांची बोळवण केली गेली. अनाथ, गतिमंदांसाठी कायमस्वरूपी पुनर्वसन कायदा केला पाहिजे, ही त्यांची मागणी आहे.

शंकरबाबा सांगतात, देशातील सर्वच सुधारगृहांमधून दरवर्षी 18 वर्षांवरील तब्बल एक लाख मुले-मुली बाहेर पडतात. महाराष्ट्रात दहा सुधारगृहे आहेत. दोन सरकारी व आठ सामाजिक संस्थांकडून चालविली जातात. यातून दरवर्षी सात ते आठ हजार मुले-मुली बाहेर काढली जातात. तरुण मुली कुठे जात असतील? त्यांचा ठावठिकाणा काय? वझ्झरच्या बालसुधारगृहातून आजवर एकही 18 वर्षांवरील मुलगी बाहेर काढण्यात आलेली नाही. त्याचे कारण सांगताना ते म्हणतात, आम्ही सरकारी अनुदान घेत नाही. त्यामुळे तरुण मुलींना बाहेर काढण्याचा हा सरकारी नियम लागू होत नाही. इतर संस्था अनुदान घेतात. त्यामुळे तिथे माया, लळा व लोभ नाही. तिथे फक्त कायदा व नियम आहेत.

शंकरबाबांनी त्यांच्या सुधारगृहातील सर्वच मुलामुलींना स्वतःचे नाव वडील म्हणून दिले. 123 मुले-मुली शंकर पापळकर हे नाव लावून राहतात. त्या सर्वांचे आधारकार्ड, रहिवासी दाखले काढण्यात आले. ज्या अनाथ मुलामुलींची लग्ने पापळकरांनी लावून दिली, त्यातील 17 जोडपी वझ्झरलाच राहतात. या सर्वांचे संगोपन शंकरबाबांच्या देखरेखीत सुरू आहे. समाजातील दानशूर मंडळी सुधारगृहाला देणगी देतात, त्यातून गाडा चालतो. तेथील संपूर्ण जबाबदारी दिव्यांग सांभाळतात. त्यांच्या जेवणाची सोय हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रमुख प्रभाकरराव वैद्य करतात, तर कपडेलत्ते शेगावचे श्री गजानन महाराज संस्थानाकडून येतात. अनेक गरजा समाजातील दाते पूर्ण करतात. सामाजिक जाणिवांची ही एक अजिबोगरीब चित्तरकथा आहे. वझ्झरला सुधारगृहाच्या 24 एकरात या दिव्यांग मुलांनी 15 हजार झाडे लावली. ती डेरेदार फुलली. पापळकर आता सर्वार्थाने बाबा झाले आहेत.