लेख – एका क्षणाचा अविचार म्हणजे आत्महत्या

>> स्नेहा अजित चव्हाण

संकटे येतात, अडचणी येतातच. प्रत्येकाला त्याचा अनुभव येतो, पण त्यात गुंतून पडण्यापेक्षा त्यावर मात करून पुढे जाता आले पाहिजे. अडचणींवर मात म्हणजे आत्महत्या करणे हा कधीच पर्याय असू शकत नाही, तर अशा वेळेला, किंबहुना अशा प्रसंगात आपला प्रतिसाद हा निर्णायक ठरत असतो. अशा प्रसंगांमधून बाहेर पडताना आपण जर हाताच्या बाह्या सरसावून आयुष्यालाच आव्हान दिले की, मी परत आलो आहे, तर तो क्षण आयुष्याला एक वेगळी दिशा देऊ शकतो.

अपयश आल्यावर आत्महत्या करणे हा एकमेव उपाय व शेवटचा पर्याय कधीच असू शकत नाही. आपले जीवन आपण का संपवतो आहोत याचा विचार करण्याची कुवत त्या क्षणी त्या व्यक्तीने गमावलेली असल्यामुळे हे टोकाचे पाऊल टाकले जाते. जगभरात आत्महत्या वाढत असून त्यात तरुण वर्गाचे प्रमाण जास्त असणे चिंताजनक आहे. सध्याचे जग टोकाच्या स्पर्धेचे झाले आहे. आपल्याला सिद्ध करण्यासाठी तरुणाई जिवाच्या आकांताने धावते आहे. यशस्वी होणे हे एकमेव ध्येय ठेवून हे सगळे सुरू आहे, पण सगळ्यांची कुवत समान नसते हे आपण विसरतो आहोत. जीवनात सगळ्यांना सगळे मिळत नाही हा साधा विचारसुद्धा कोणी करत नाही आणि एखाद्या अपयशामुळे खचून लोक आत्महत्या करतात. कुस्तिगीर ऋतिका फोगटने केलेली आत्महत्या हे त्याचे उदाहरण. तिच्या आत्महत्येमुळे देशभरातील क्रीडाप्रेमींना धक्का बसला. गीता आणि बबिता फोगट यांची चुलत बहीण असलेली ऋतिका ही वस्ताद महावीरसिंह फोगट यांची शिष्या. कुस्तीच्या एका स्पर्धेत अंतिम फेरी गाठण्यात आलेल्या अपयशातून ऋतिका फोगटने आपले जीवन संपविले. लाखो जीव घेणारा क्रूर हिटलर…त्याने पण शेवटी आत्महत्या केली. सुंदर विचार देणारे साने गुरुजी आत्मघात करून घेतात. ‘मनशक्ती’ नावाचे मनाला खंबीर करण्याचे शिक्षण देणारे लोणावळ्याचे स्वामी विज्ञानानंद मंत्रालयावरून उडी मारून जीव देतात, आध्यात्मिक गुरू अशी ओळख निर्माण करून कित्येकांना आधार देणारे भैय्यूजी महाराज आपलं जीवन एका बंदुकीच्या फायरने आपल्या हाताने संपवतात. पॉझिटिव्ह विचार देणारा चित्रपट करूनही सुशांतसिंह राजपूत याने नैराश्यातून आत्महत्या केली. सहा-आठ महिन्यांपूर्वी नैराश्याशी लढा कसा द्यायचा हे शिकविणाऱया डॉक्टर शीतल आमटे यांनी आपलं जीवन झोपेच्या गोळ्या घेऊन संपवलं.

नामवंत असल्यामुळे त्यांच्या आत्महत्येवर लगेच चर्चा झाली; पण जगात आणि देशभरात रोज असे अनेक तरुण-तरुणी आत्महत्या करत असल्याची वस्तुस्थिती आहे. आत्महत्या करण्यामागील कारणे अनेक असू शकतील. सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती, अपयशाची भीती, उदासीनता, नैराश्य, अपयश न स्वीकारणे, सामाजिक अस्वस्थता, मानसिक अस्वस्थता, भयगंड(फोबिया), मानसिक ताणतणाव इत्यादी.

वाढत्या आत्महत्या रोखण्याबाबत मार्ग काय, यावर विचार करता एक शिक्षिका आणि समुपदेशिका म्हणून मला असे वाटते की जसे शारीरिक आरोग्य महत्त्वाचे आहे तितकेच मानसिक आणि भावनिक आरोग्य ही आवश्यक आहे. मानसिक प्रथमोपचार ही संकल्पना रूढ होणे खूप गरजेचे आहे.
शालेय अभ्यासक्रमात मानसिक आरोग्य आणि लवचिक मनोवृत्ती हा विषय समाविष्ट करावयास हवा. मिळालेल्या यशाप्रमाणे अपयशाबाबतही घरी मोकळेपणाने चर्चा होण्याची गरज आहे. स्पष्ट शब्दांत बोलून आपल्या भावना व्यक्त करायला आपण शिकायला हवे. एखाद्याच्या वागण्यात एकदम बदल झाला, तो स्वतःला इजा करून घ्यायला लागला, तर त्याच्याकडे लगेच लक्ष द्यावयास हवे. गरज पडली तर त्या व्यक्तीला मानसोपचार तज्ञाकडेसुद्धा घेऊन जावयास हवे.

भावुक क्षणातून बाहेर पडता आले पाहिजे. अशा भावुक क्षणांमधून वेगळा विचार करून जे लोक वेगाने बाहेर पडतात, त्यांची प्रगती तेवढय़ाच वेगाने होत असते. आत्महत्या हा कुठल्याच नैराश्यावर बाहेर पडण्याचा मार्ग असू शकत नाही. उलट या घटनेमुळे, किंबहुना या प्रसंगामुळे हा टोकाचा मार्ग निवडण्यापेक्षा नवा मार्ग स्वीकारला पाहिजे. वेगळा विचार करून जे लोक वेगाने बाहेर पडतात, त्यांची प्रगती तेवढय़ाच वेगाने होत असते. आत्महत्या हा कुठल्याच नैराश्यावर बाहेर पडण्याचा मार्ग असू शकत नाही. उलट हा टोकाचा मार्ग निवडण्यापेक्षा नवा मार्ग स्वीकारला पाहिजे किंवा अशा प्रसंगातून आपण कसे बाहेर येतो ही बाबसुद्धा निर्णायक ठरू शकते. आयुष्य आपल्याला असे अनेकदा भावुक करत असते आणि कधी कधी आपल्या या भावनांचे नैराश्यामध्ये रूपांतर होते. यातून आपण कसे बाहेर पडतो हे महत्त्वाचे आहे. हाच मुद्दा महत्त्वाचा ठरत असतो. क्षणामधून आपण कसे बाहेर पडतो, हे जास्त महत्त्वाचे असते. आपल्याला आयुष्यात किती वेळा अपयश आले किंवा आयुष्याने आपला किती वेळ आघात केला, किती वेळा आपण कठीण प्रसंगात अडकलो किंवा आयुष्याने आपल्याला अशा कठीण प्रसंगात अडकवले, ज्या प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी आपण तयार नव्हतो या प्रश्नांचा विचार करता करता आपण अनेकदा डिप्रेशनमध्ये जातो. अनेक लोक तर अशाच प्रश्नांमध्ये किंवा भावनाशीलतेमध्येच गुंतून पडलेले दिसतात, पण आपल्याला मात्र त्यातून बाहेर पडायला हवे. हे असे गुंतून राहणे योग्य नाही. अशा अवस्थेमध्ये लवकर बाहेर पडणे हे आपल्या विचार पद्धतीवर अवलंबून असते. आपल्या आजूबाजूला जे लोक यशस्वी झालेले दिसतात त्यांच्या आयुष्यात हे असे प्रसंग आलेलेदेखील आपल्याला नक्कीच दिसतील. आयुष्यामध्ये प्रत्येकालाच कधी ना कधी तरी अपयश येतच असते. त्यातून वेळीच बाहेर पडून अनेक लोक थेट आयुष्याला आव्हान देतात, नवे पर्याय निवडतात, चांगले निर्णय घेतात आणि त्यांची गाडी आयुष्याच्या वळणावर परत आलेली दिसते. म्हणूनच नेहमी हीच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, आयुष्यामध्ये जेव्हा अनेक संकटे समोर ‘आ’ वासून उभी असतात तेव्हा त्या मानसिक अवस्थेमधून कसे बाहेर पडतो हे महत्त्वाचे असते.

एक सोपं उदाहरण घेता येईल. आपण समजा रस्त्यावरून चाललो आहोत, वाटेमध्ये आपल्या पायात काटा घुसला, तर त्यावेळी दुःख होणार, क्वचित डोळ्यांतून पाणी येणार, थोडा वेळ पाय दुखणार हे अगदी स्वाभाविकच आहे, पण पायात काटा तसाच ठेवून आपण तिथेच बसून राहत नाही. आपण तो काटा काढतो आणि पुढे चालू लागतो. कदाचित थोडे लंगडत, थोडे कमी वेगाने चालतो, पण चालू लागतो. आयुष्यात येणाऱया भावुक क्षणांचं असंच आहे. ते तेवढय़ा क्षणांपुरतं मर्यादित असायला हवं. त्यातून वेळीच बाहेर पडणं आणि आपल्या मार्गावर चालू लागणं हे आपलं उद्दिष्ट असायला हवं.
अपयशामुळे आपण निराश होणार, नाराज होणार ही अगदी स्वाभाविक प्रतिक्रिया असते. तशी ती असणारच. कारण आपण माणूस आहोत. भावनिक होणे, भावुक होणे हा मनुष्य स्वभावविशेष आहे, पण ही नाराजी नैराश्यात रूपांतरित करू नका. हे फक्त काही क्षणांपुरतं असतं. निराश होणं आणि निराश राहणं यातील फरक समजून घेतला पाहिजे. निराश होणे, उदास होणे, अपयश, दुःख, ताणतणाव, नैराश्य यातून बाहेर पडण्यासाठी पंख्याला लटकणे, हाताची नस कापणे, स्वतःवर विषप्रयोग करणे, थोडक्यात काय तर आत्महत्या करणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. त्यापेक्षा एखाद्या कणखर खांद्याचा आधार घ्या, मन मोकळं करा. हसा, बोला, रडा, भांडा, व्यक्त व्हा आणि पुन्हा नवीन भरारी घेत रहा…जोपर्यंत श्वास स्वतःहून थांबणार नाही !

(लेखिका शिक्षक समुपदेशक आहेत)