कमाल ऊर्जेचा धमाल धिंगाणा…!

राज चिंचणकर / रंगनाट्य

वर्तमान स्थितीचे अवलोकन करीत सर्वसामान्य रसिकांना काय हवे याची जाण ठेवत कम्माल धमाल करणारे आणि मनमुराद हसवणारे नाटक…

नाटय़ रसिकांचे वेगवेगळ्या पद्धतीने रंजन कसे करता येईल, हे संतोष पवार या लेखक-दिग्दर्शकाच्या सुपीक डोक्यात नेहमीच पक्के असते आणि त्याचे प्रतिबिंब कायम रंगभूमीवर पडलेले दिसते. लेखक-दिग्दर्शक म्हणून तो नाटक जगतोच; परंतु एक अभिनेता म्हणूनही त्याच्या ‘एन्ट्री’ला हुकमी टाळ्या पडतात. लोकनाटय़ हा त्याचा मूळ बाज आहे आणि या माध्यमातून रंगभूमीवर तो जी काही ‘सोंगे’ नाचवतो, त्यालाही रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. संतोष पवारने रसिकांची नाडी अचूक ओळखत आणि अनेक नाटके करत त्याचा विशिष्ट असा चाहता वर्ग निर्माण केला आहे. त्याच्या या चाहत्यांनीसुद्धा त्याच्यावर भरभरून प्रेम करत, त्याला नवनवीन ‘नाटके’ करण्यास प्रोत्साहन दिले आहे. ‘यदा कदाचित रिटर्न्स’ हा या वाटेवरचाच एक प्रयोग म्हणावा लागेल.

सातत्याने नवीन कलाकारांना नाटकात खेचून आणणे हे त्याचे अजून एक वैशिष्टय़! त्याच्या मनातले नाटक रंगभूमीवर उभे करण्यासाठी त्याला तसेच अतरंगी कलाकारही सहज वश होत असतात आणि ‘यदा कदाचित रिटर्न्स’ या नाटकाच्या बाबतीतही काही वेगळे घडलेले नाही. ‘संतोष पवार म्हणजे लोकनाटय़ात रंगणारा कलाकार’ असा एक छाप त्याच्यावर उमटला असला तरी त्याकडे बलस्थान म्हणून पाहत, आपला वेगळा ठसा उमटवत आणि सर्वसामान्य रसिकांना काय हवे याची जाण ठेवत तो सातत्याने ‘नाटक एके नाटक’ करत राहिला आहे.

‘यदा कदाचित रिटर्न्स’ या नाटकात लेखन व दिग्दर्शनाच्या जबाबदारीसह संतोष पवार स्वत आठ भूमिका रंगवत आहे. त्याच्या या कामगिरीला तशीच मजबूत साथ देणाऱया युवा कलाकारांची भट्टी त्याने यात झकास जुळवून आणली आहे. या नाटकात त्याने प्लॉट निवडला आहे तो ‘बाहुबली’ या कलाकृतीचा! साहजिकच त्यातली बाहुबली, कटप्पा, देवसेना, भल्लालदेव आदी पात्रे नाटकात अर्थातच आहेत, पण या सगळ्यांच्या मांडीला मांडी लावून थेट पाम, वेताळ, शाहिस्तेखान, बिरबल, ािढकेटपटू वगैरे अतरंगी पात्रे कशी काय बसू शकतात आणि असे हे सर्व जुळवून आणण्यात संतोष पवारला काय ‘संतोष’ मिळतो हे तोच जाणे! पण या सगळ्या पात्रांची सरमिसळ संतोष पवारने या नाटकात बेमालूमपणे केली आहे आणि त्याला तसेच एक कारणही आहे. या सगळ्या पात्रांच्या सक्षम खांद्यांवरून त्याने एका सामाजिक आणि ज्वलंत विषयाला हात घातला आहे. मात्र हे करताना त्याने मूळ विनोदाची कास अजिबात सोडली नसल्याने हे नाटक म्हणजे ‘निव्वळ धमाल’ या पठडीत अलगद जाऊन बसते, पण फक्त अशा एखाद्या विषयाला हात घालूनच संतोष पवार थांबेल तर अजून काय हवे? त्यासोबत वर्तमान स्थितीचे अवलोकन करत, त्यावर प्रासंगिक कोटय़ा करत, टपल्या मारत तो वर्तमान सामाजिक घटनांना थेट नाटकात घेऊन येतो आणि नाटकाच्या प्रत्येक प्रयोगागणिक या घटना ‘अपडेट’ करत जातो. अर्थात त्याचे प्रतिबिंब नाटकाच्या पुढच्या प्रयोगांत पडत जाते आणि रसिकांनाही ते सर्व हवेहवेसे वाटत राहते.

या नाटकात हे सर्वकाही अगदी ठासून भरलेले आहे. संतोष पवारच्या यातल्या आठ भूमिकांसह इतर सर्व पात्रे स्वतची स्वभाववैशिष्टय़े घेऊनच रंगमंचावर अवतरतात आणि धुमाकूळ घालतात. या सर्व पात्रांचे एकमेकांशी ‘गिव्ह अँड टेक’ अचूक टायमिंग साधून झालेले दिसते. सळसळत्या ऊर्जेने हे सर्व कलावंत भारलेले आहेत. या नाटकातली ािढकेटची मॅच; विशेषत त्या मॅचच्या ‘अ‍ॅक्शन रिप्ले’चा प्रसंग म्हणजे या नाटकाचा ‘हायलाईट’ म्हणावा लागेल. यातही सर्व कलाकारांनी कमाल केली आहे. नेत्रसुखद असा हा प्रसंग आवर्जून अनुभवण्याजोगा आहे.

प्रदीप वेलोंडे, निकिता सावंत, माधुरी वायंगणकर, रोहन कदम, ओशीन साबळे, गौरी देशपांडे, कल्याणी आगवाले, हर्षदा कर्वे, अनिकेत कोथरुडकर, अभिषेक औटी, अद्वैत हातवळणे, दर्शन बोटेकर, प्रतीक साठे, निकिता सावंत, ओमकार गावडे आदी कलाकारांचे नाटकातले भन्नाट टीमवर्क अचंबित करणारे आहे. स्वतच्या भूमिकेचा स्वतंत्र ठसा उमटवत या सर्वच कलाकारांनी, ‘सबकुछ’ संतोष पवारसह रंगभूमीवर काम करताना ‘हम भी कुछ कम नहीं’ हे अधोरेखित केले आहे.

शीतल तळपदे यांनी त्यांच्या प्रकाश योजनेद्वारे केलेले अभ्यासपूर्ण प्रयोग रंगमंचावर विशेष खुलले आहेत. संदेश बेंद्रे यांच्या नेपथ्याची व्यवस्थित साथ नाटकाला लाभली आहे. अनिकेत जाधव याचे नृत्यदिग्दर्शन जमून आले आहे. या नाटकात विविध प्रकारची पात्रे आहेत. त्यामुळे त्यांची रंगभूषा व वेशभूषा महत्त्वाची ठरते. यापैकी रंगभूषेचे आव्हान किशोर पिंगळे यांनी झकास पेलत पात्रांना त्यांचा चेहरा बहाल केला आहे. वेशभूषा संतोष पवारचीच आहे आणि यातल्या विविध पात्रांच्या वैशिष्टय़ात अधिक रंग भरण्याचे काम त्याद्वारेच केले गेले आहे. या मंडळींसह तंत्रज्ञांची उत्तम साथ या नाटकाला लाभली आहे. मानसी किरण केळकर यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे. ‘सोहम प्रॉडक्शन्स’ निर्मित व ‘भूमिका थिएटर्स’ प्रकाशित हे नाटक हमखास मनोरंजन करणारे तर आहेच; परंतु त्याचबरोबर रंगभूमीवरचे आजचे उमदे कलाकार एखाद्या नाटय़कृतीत त्यांची कमाल ऊर्जा वापरत काय धमाल करू शकतात, हेही अधोरेखित करणारे आहे.

> [email protected]