आभाळमाया – दूरस्थ ‘अस्तित्वा’चा वेध

>> वैश्विक, [email protected]

अमेरिकेतील ‘सेटी’ नावाची एक संस्था दूरस्थ बुद्धिवंतांचा शोध घेण्यात गुंतली आहे. सेटी म्हणजे ‘सर्च फॉर एक्स्ट्राटेरेस्टेरिअल इन्टेलिजन्स’. पृथ्वीबाहेरच्या अर्थात एखाद्या परताऱ्याच्या ग्रहमालेतील एखाद्या ग्रहावर कोणी (आपल्यासारखा) बुद्धिवान प्राणी राहतो का, याचा शोध घेण्याचं कार्य ‘सेटी’ने 1984 पासून सुरू केलंय. हॉलीवूड चित्रपट किंवा आपल्या चित्रपटाला कुणी ‘जादू’ वगळता खरा एलियन किंवा परताराग्रहवासी अजून तरी सापडलेला, संपर्कात आलेला नाही. तसे ‘विचित्र’ प्राणी दिसल्याच्या अनेक कथा सांगितल्या जातात. पण त्या वैज्ञानिक कसोटीवर उतरल्या पाहिजेत ना! म्हणून ‘सेटी’च्या स्पेलिंगमधलं पहिलं अक्षर ‘एस’ हे उलटे छापून त्याचं प्रश्नचिन्हात रूपांतर करणं यात खरोखरच कल्पकता दिसते. त्यांचा हा प्रश्न आजपर्यंत तरी सुटलेला नाही. तो सुटेल तेव्हा या आद्याक्षरातला ‘एस’ कदाचित सुलटा होईल!

‘सेटी’चं कार्य मुखत्वे तीन केंद्रांमधून चालते. कार्ल सेगन सेंटर, त्यानंतर सेंटर फॉर एज्युकेशन आणि सेंटर फॉर पब्लिक आऊटरिच. त्याचं पॉडकास्ट आठवडय़ाचं चर्चासत्र प्र्रसृत करत असतं. विश्वात अन्यत्र कुठे आपल्यासारखं म्हणजे ज्या ‘अस्तित्वा’शी (एण्टिटीशी) संवाद साधता येईल असं कोणी आहे का याची उत्सुकता अगदी सामान्यांनाही असू शकते. गेल्या काही वर्षांमधल्या ‘अंतराळी’ प्र्रगतीमुळे सर्वत्र निर्माण झालेलं कुतूहल म्हणजे एखाद्या ‘परग्रहा’वर माणसासारखं कुणी आहे का? आता आपल्या सूर्यमालेतील ग्रहसुद्धा आपल्या पृथ्वी या ग्रहाच्या दृष्टीने परग्रहच. त्यामुळे पूर्वी मंगळावर ‘माणूस’ आहे का याच्या कल्पना, कथा आणि शोध घ्यायचा प्रयत्न झाला. तिथं तसं कोणीही नाही आणि त्यापलीकडच्या अतिदूरच्या शीतग्रहावर कोणी असण्याची शक्यता नाही हे लक्षात आल्यावर प्रगत अंतराळ विज्ञानाची नजर इतर कुठल्यातरी ताऱयाभोवतीच्या ग्रहमालेकडे आणि त्यातील ‘पृथ्वीसारख्या’ ग्रहावरच्या बुद्धिमान जिवाकडे लागली. अर्थात ते ‘नजरे’ला दिसणं शक्य नाही, पण त्यांचे ‘रेडिओ’ संदेश येऊ शकतात. ही शक्यता लक्षात घेऊन आपण पृथ्वीवासीयांनीही 1974 मध्ये हर्क्युलस (एम-13) (शौरी) तारकासमूहाच्या दिशेने एक रेडिओ संदेश पाठवला आहे. तो तिथे पोचायला 25 हजार वर्षे आणि ‘त्यांनी’ उत्तर दिलं तर ते कळायला आणखी तितकीच वर्षे असा एकूण 50 हजार वर्षांचा मामला आहे. परंतु त्यापूर्वीच ‘इतरत्र’ वसलेले ‘कोणीतरी’ आपल्या संपर्कासाठी आधीच प्रयत्न करत असले तर? …तर ते आपल्याला कळायला नको? त्याच्याच तर प्रयत्नात ‘सेटी’ आहे. या संशोधनात काही गमतीच्या गोष्टीही घडतात. याच संस्थेचे पॉल शूल्झ हे आम्हाला मुंबईत भेटले होते. दूरस्थ रेडिओ-सिग्नलचा वेध घेताना एका सकाळी त्यांना त्यांच्या लॅपटॉपवर एक ‘सरळ’ ‘संदेश रेषा’ आढळली. पॉल यांना अत्यानंद झाला. आला वाटतं ‘कुणाचा’ तरी दूरस्थ संदेश! या आनंदात त्यांनी खिडकी उघडली तर तिथे एक मोबाईल फोनचा टॉवर ‘उगवलेला’ दिसला. ती रेषा हा त्याचाच प्रताप होता. …तर गंमत जाऊ द्या, पण एकूणच ‘सेटी’चं काम कसं चालतं ते पाहू. थॉमस पिएर्सन यांनी स्थापन केलेल्या या संस्थेचे सभासद म्हणजे नामवंत मंडळी. त्यात दोन नोबेलवंतही आहेत. लेझरचा शोध लावणारे चार्लस टेनिस, हॅपिटायटिस-बी व्याधीवरचं व्हॅक्सिन शोधणारे ब्लम्बर्ग यांचाही त्यात समावेश आहे. विख्यात विज्ञान कथालेखक आणि कल्पक बुद्धीचे कार्ल सेगन, तसंच बर्नार्ड ऑलिव्हर, डेविड पॅकार्ड, विल्यम हय़ुलेट, गॉर्डन मूर, पॉल ऍलन अशा अनेक विज्ञान-विचारवंतांनी ‘सेटी’ला मूर्त स्वरूप दिलं.

अवकाशातील दूरस्थ परताराग्रहांवरील अज्ञात ‘अस्तित्वा’चा शोध घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे रेडिओ लहरी. त्यासाठी ‘सेटी’चा ऍलेन टेलिस्कोप ऍरे कार्यरत असतो. याशिवाय, पृथ्वीवरचे केक टेलिस्कोप किंवा चिली देशातील महाकाय टेलिस्कोपसह अंतराळातील हबल, स्पिझर टेलिस्कोप, केपलर टेस दुर्बिण, हर्शल स्पेस टेलिस्कोप यांसारख्या दुर्बिणींचाही उपयोग केला जातो. ‘नासा’सुद्धा ‘सेटी’ला सहकार्य करते. अंतराळातील संभाव्य बुद्धिमान सजीवाकडे एखादा संदेश पाठवण्यापूर्वी त्यावर जगात सर्वत्र सर्वंकष चर्चा होऊनच निर्णय घेतला जावा असं 13 फेब्रुवारी 2015 च्या बैठकीत ठरलं. त्याविषयीचा लेख ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने प्रसिद्ध केला. त्याला आता नऊ वर्षे झाली.

मग या ‘सेटी’ला काही आलंय का? ‘तिथे’ कोणी असल्याचं समजलंय का? 2012 च्या जानेवारीत ‘ऍरोकॉथ’भोवतीच्या ‘चंद्रा’चा त्या दृष्टीने शोध घेण्याचा प्रयत्न सुरू झाला. या नेपच्यूनपलीकडच्या किपर पट्टय़ातील एका वीसेक किलोमीटर लांबीच्या जोड-अशनीवर ‘काही आहे का’ याचा वेध ‘न्यू होरायझन स्पेस प्रोब’ने घेतला आहे. सूर्य संकुलातील हे जवळपास शेवटचं स्थान आहे. त्याला सूर्याभोवती फिरायला सुमारे साडेसात अब्ज वर्षे लागतात. ‘सेटी’चा कार्यक्रम हा स्वयंसेवी पद्धतीने चाललेला भविष्यवेधी म्हणजे ‘फ्युचरिस्टिक’ आहे. मात्र एम-13 या मेसिए यांनी नोंदलेल्या 89 तारकासमूहांपैकी तेरा क्रमांकाच्या बंदिस्त तारकासमूहाकडे (ग्लोब्युलर क्लस्टर) पाठविण्यात आला आहे. हे ग्लोब्युलर क्लस्टर कसं आहे आणि त्या संदेशाचं काय झालं याविषयी तसंच तो ‘संदेश’ कोणत्या भाषेत पाठविण्यात आलाय त्यासंबंधी पुढच्या लेखात.