‘बॅझबॉल’ इंग्लंडच्या अंगाशी, 47 धावांत 6 फलंदाज धारातीर्थी 

गेले वर्षभर ज्या ‘बॅझबॉल’ खेळामुळे इंग्लंड संघाचे कौतुक होत होते तोच आक्रमक खेळ ‘अॅशेस’ मालिकेत इंग्लंडच्या अंगाशी आला आहे. गुरुवारी 4 बाद 278 अशा सुस्थितीत असलेला इंग्लंड तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियन गोलंदाजीपुढे आडवा पडला. अवघ्या 47 धावांत इंग्लंडचे 6 फलंदाज बाद केले. सकाळी सकाळीच इंग्लंडला बसलेल्या हादऱयांमुळे त्यांचा पहिला डाव 325 धावांवरच आटोपला आणि ऑस्ट्रेलियाने 91 धावांची जबरदस्त आघाडी घेतली. तिसऱया दिवशी दुसऱया डावात ऑस्ट्रेलियाने पावसामुळे खेळ थांबला तेव्हा 2 बाद 130 अशी मजल मारत आपली आघाडी 221 पर्यंत वाढवली आणि लॉर्ड्स कसोटीवरही आपली पकड मजबूत केली.

गुरुवारी ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ 65 धावांत गारद केल्यानंतर इंग्लंडने बेन डकेटच्या 98 धावांच्या घणाघातामुळे दिवसअखेर 4 बाद 278 अशी दमदार मजल मारली होती. कसोटी क्रिकेटला रंगतदार करणारा इंग्लंडचा आक्रमक अर्थातच ‘बॅझबॉल’ खेळ वर्षभर धुमाकूळ घालत होता, मात्र तो ऑस्ट्रेलियासमोर अपेक्षित धमाका करू शकला नाही. गुरुवारी 4 बाद 278 या धावसंख्येनंतर इंग्लंड ऑस्ट्रेलियाच्या 416 ला ओलांडून आघाडी मिळवेल, असे तारे चमकवले होते, पण प्रत्यक्षात इंग्लिश खेळाडूंनाच दिवसा तारे दिसले.

दिवसाच्या दुसऱयाच चेंडूवर आक्रमक कर्णधार बेन स्टोक्सची स्टोकविरहित संथ खेळी 17 धावांवर संघाला खतऱयात टाकून संपली. विकेट पडल्यानंतर संघाचा खेळ सावरण्यापेक्षा मधल्या फळीतील फलंदाजांनी आक्रमकपणा कायम ठेवला आणि आपल्याच पायावर कुऱहाड घातली. ब्रुकही 50 वर बाद झाला आणि जॉनी बेअरस्टॉने आपली विकेट गमावली. कुणीतरी संघाचा डाव सावरेल, अशी अपेक्षा करण्याआधीच इंग्लंडचा डाव पहिल्या सत्राच्या सव्वा तासाच्या खेळात गडगडला. नॅथन लायन क्षेत्ररक्षण करताना जायबंदी झाला आणि त्याला मैदान सोडावे लागले. तरीही पॅमेरून ग्रीन आणि ट्रव्हिस हेडने कामचलाऊ गोलंदाजी करत तीन विकेट टिपल्या. स्टार्कने गुरुवारच्या ब्रुक आणि स्टोक्सला बाद करून इंग्लंडच्या डावाला सुरुंग लावला.

अखेर लायन जखमी झाला

गेली दहा वर्षे सातत्याने कसोटी खेळत सलग 100 कसोटी खेळण्याचा पराक्रम रचणाऱया नॅथन लायनला अपशकुन झाला. क्षेत्ररक्षण करताना त्याच्या पोटरीचा स्नायू दुखावल्यामुळे त्याला मैदानाबाहेर जावे लागले आणि आता त्याची दुखापत गंभीर असल्यामुळे त्याला उर्वरित मालिकेलाही मुकावे लागण्याची शक्यता संघाच्या फिजिओने व्यक्त केली आहे. तो आता लॉर्ड्स कसोटी खेळणार नसल्यामुळे ऑस्ट्रेलियाला आपल्या कामचलाऊ गोलंदाजांच्या सहाय्याने आपली षटके टाकावी लागणार आहेत. आता लायनच्या जागी संघात टॉड मर्फीची निवड केली जाऊ शकते.