सीमा हैदर प्रकरणात एटीएसची मोठी कारवाई, उत्तरप्रदेशातून दोघेजण ताब्यात

पाकिस्तानातून नेपाळमार्गे हिंदुस्थानात बेकायदेशीरपणे घुसलेल्या सीमा हैदर संबंधित प्रकरणात एटीएसने मोठी कारवाई केली आहे. एटीएसने उत्तरप्रदेशातील बुलंदशहर येथून दोन भावांना ताब्यात घेतले आहे. या दोघांवर सीमा हैदर आणि सचिन मीना यांच्या आधार कार्ड आणि कागदपत्रांमध्ये छेडछाड केल्याचा आरोप आहे. पुष्पेंद्र मीना आणि पवन मीना अशी त्यांची नावे असून ते अहमदगडमध्ये जनसेवा केंद्र चालवतात. सीमा हैदरबाबत तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे एटीएसने रविवारी रात्री पुष्पेंद्र आणि पवनला ताब्यात घेतले आहे.

पुष्पेंद्र आणि पवन यांच्यावर सीमा हैदर आणि सचिन मीना यांच्या आधार कार्ड आणि इतर कागदपत्रांमध्ये छेडछाड केल्याचा आरोप आहे. UP ATS ने संध्याकाळी उशिरा पुष्पेंद्र मीणा आणि पवन मीना यांना अहमदगडमधील लोकसेवा केंद्रातून ताब्यात घेतले आहे. यूपी एटीएसने पुष्पेंद्र आणि पवन यांना बुलंदशहर पोलीस स्टेशन अहमदगड परिसरातील अहमदगड शहरातून चौकशीसाठी त्यांच्यासोबत नेले आहे. पोलिसांच्या या कारवाईनंतर सीमा हैदर आणि तिचा प्रियकर सचिन मीना यांच्या अडचणी वाढू शकतात.

सचिन याने बनावट नावाने हॉटेल बुक केल्यामुळे बुलंदशहर येथून या भावांना अटक करण्यात आली. नेपाळची राजधानी काठमांडू येथील एका हॉटेल मालकाने सांगितले की सीमा हैदर आणि सचिन मीना त्यांच्या हॉटेलमध्ये थांबले होते. हॉटेलच्या मालकाने सांगितले की, सचिन आधी हॉटेल बुक करण्यासाठी आला होता. दुसऱ्या दिवशी पत्नी येणार असल्याचे त्याने सांगितले होते. दुसऱ्या दिवशी सीमा आली. हॉटेल मालकाने सांगितले की, सचिनने शिवांश या बनावट नावाने हॉटेल बुक केले होते.