आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या नितीन गडकरींवर कारवाई कधी?: अतुल लोंढे

भारतीय जनता पक्षाचे नागपूर मतदारसंघाचे उमेदवार नितीन गडकरी यांनी प्रचारासाठी शाळकरी मुलांचा वापर केल्याच्या तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगाने NSVM फुलवारी शाळेच्या संचालकावर कारवाई करण्याचे निर्देश दिले, त्याचे स्वागतच आहे परंतु नितीन गडकरी यांच्यावर कारवाई केलेली नाही. शाळा संचालकांना दोषी ठरवून कारवाई होत असताना नितीन गडकरी यांच्यावर कारवाई कधी करणार? असा प्रश्न प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.

यासंदर्भात माहिती देताना अतुल लोंढे म्हणाले की, दिनांक 1 एप्रिल 2024 रोजी NSVM फुलवारी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना दुपारी 12 ते 1 वाजण्याच्या दरम्यान वैशाली नगर भागात भाजपा उमेदवार नितीन गडकरींच्या प्रचार रॅलीत सहभागी केले होते. शाळकरी मुलांना राजकीय प्रचारासाठी वापरणे हे चुकीचे व अत्यंत गंभीर आहे. निवडणुकीसंदर्भातील कार्यक्रमात लहान मुलांचा वापर करु नये असे निवडणुक आयोगाचे स्पष्ट निर्देश असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. या प्रकरणी दिनांक 3 एप्रिल 2024 रोजी राज्य निवडणूक अधिकारी यांना पत्र लिहून काँग्रेस पक्षाच्या मुख्य प्रवक्ता या नात्याने तक्रार दाखल केली होती, या तक्रारीची दखल घेऊन शाळा संचालकांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत ही स्वागतार्ह बाब आहे पण शाळकरी मुलांना प्रचारासाठी बोलावणारे व त्यासाठी शाळेवर दबाव टाकणा-या नितीन गडकरी आणि भाजपावर काहीही कारवाई केलेली नाही. या प्रकरणात नितीन गडकरी आणि शाळेचे संचालक दोघेही दोषी आहेत त्यामुळे नितीन गडकरींवरही कारवाई झाली पाहिजे असे अतुल लोंढे म्हणाले.