केंद्रात सरकार येणार नसल्याने एनडीएच्या घटक पक्षात चलबिचल – अतुल लोंढे

भारतीय जनता पक्षाचे सरकार 4 जूनला पुन्हा सत्तेत येणार नाही हे स्पष्ट झालेले आहे. अब की बार 400 पार, च्या कितीही गप्पा मारल्या तरी देशात तशी परिस्थिती नाही. लोकसभा निवडणुकीतील पराभव दिसत असल्याने भाजपाच्या सहकारी पक्षांमध्येही चलबचल वाढू लागली आहे. कारण 4 जूनला एनडीएचा पराभव होऊन इंडिया आघाडीचेच सरकार येणार असे चित्र असल्याने एनडीएमध्ये चिंतेचे वातावरण आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, देशाचे मावळते गृहमंत्री देशाच्या मावळत्या पंतप्रधानांच्या बाबतीत असे म्हणत असतील की 4 जूननंतर होणाऱ्या पंतप्रधान पदाच्या शपथविधी सोहळ्याला ते उपस्थित असतील तर जरा तपासून पाहिले पाहिजे. भंडाऱ्यापासून पंजाबपर्यंत शेतकरी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना गावात प्रवेश करु देत नाहीत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी घेराव घातला व पळवून लावले तरीही भाजपा नेत्यांचे डोळ्यात धूळ फेकण्याचे काम सुरुच आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व भाजपाबरोबर सत्तेत असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार हे तर बारामतीचे मतदान झाल्यानंतर कुठेच दिसले नाहीत. मुंबईच्या प्रचारातही अजित पवार दिसले नाहीत. 4 जूनला वेगळा निकाल लागला तर म्हणजे इंडिया आघाडीचे सरकार आले तर अजित पवार यांना त्यांच्याबरोबरचे सहकारी त्यांच्यासोबतच राहतील का? पक्षाचे अधिवेशन होईल का? असे प्रश्न पडलेले आहेत आणि ही चिंताच त्यांच्या आजच्या भाषणातून स्पष्ट झाली आहे. भाजपाने कितीही 400 पारचा नारा दिला तरी त्यात त्यांना यश येणार नाही, 4 जूननंतर केंद्रात इंडिया आघाडीचेच सरकार येणार, असा विश्वास अतुल लोंढे यांनी व्यक्त केला आहे.