मोदी सरकारमुळेच देश सोडावा लागतोय, महिला पत्रकाराचा आरोप

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना दुसरीकडे मात्र एका महिला पत्रकाराने व्हिसा वाढवण्यास केंद्र सरकारने नकार दिल्याने देश सोडला आहे. त्यांनी केलेलं वार्तांकन हे मर्यादा ओलांडणारं असल्याचा ठपका ठेवून त्यांचा व्हिसा वाढवण्यास नकार देण्यात आला आहे.

या पत्रकाराचं नाव अवनी डायस असं आहे. अवनी डायस या ऑस्ट्रेलियाच्या ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या दक्षिण आशियाई ब्युरो प्रमुख आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येसंदर्भात केलेल्या वार्तांकनावर केंद्र सरकारने आक्षेप घेतला होता. त्या वार्तांकनात मी माझ्या मर्यादा ओलांडल्याचं कारण देत मोदी सरकारने गेल्या आठवड्यात माझा व्हिसा वाढवण्यास नकार दिला, त्यामुळे 19 एप्रिल रोजी देश सोडावा लागला, असं अवनी यांचं म्हणणं आहे.

तसंच, त्यांना निवडणुकीचं वार्तांकन करण्याची परवानगी मिळाली नाही. आम्हाला त्याच लोकसभा निवडणुकीपूर्वी देश सोडावा असं मोदी सरकारतर्फे सांगण्यात आलं, ज्याला पंतप्रधान मोदी लोकशाहीची जननी असं म्हणतात, असा आरोप अवनी डायस यांनी केला आहे. मोदी सरकारमुळे मला माझ्या कामात अनेक अडथळे आले. हे जाणूनबुजून करण्यात आलं असून मोदी सरकारमुळेच मला हा देश सोडावा लागत असल्याचंही अवनी डायस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलिया सरकारने केलेल्या हस्तक्षेपामुळे व्हिसा दोन महिन्यांनी वाढवण्यात आला. मात्र, ही माहिती त्यांना अवघ्या 24 तास आधी देण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.