अमित शहांनी लोकसभेत खोटं बोलणं हा चिंतेचा विषय, बच्चू कडूंची टीका

कलावती यांच्याबाबत दावा करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी धडधडीत असत्य विधान केलं होतं. लोकसभेत बोलताना त्यांनी हे विधान केल्याने ती अधिक गंभीर बाब आहे. यवतमाळ जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची पत्नी कलावती यांना मोदी सरकारने मदत केल्याचा दावा शहा यांनी केला होता. प्रत्यक्षात या महिलेला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मदत केली होती. जर अमित शहा लोकसभेत खोटं बोलत असतील तर ती त्यांच्या पक्षासाठी गंभीर बाब आहे असं मिंधे गट आणि भाजपच्या सोबत असलेले अपक्ष आमदार बच्चू कडू यांचे म्हणणे आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेवर बोलताना काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांच्यावर टीका करताना कलावती यांचा उल्लेख केला होता. यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील जळकाच्या रहिवासी असलेल्या कलावती यांचा पती शेतकरी होता आणि त्याने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली होती. या महिलेला मोदी सरकारने मदत केल्याचा दावा शहा यांनी आपल्या भाषणात केला होता. कलावती यांनीही अमित शहा खोटे बोलत असल्याचे म्हटले होते. यामुळे अमित शहांसह मोदी सरकारचेही बिंग फुटले आहे.

याबाबत बोलताना बच्चू कडू यांनी म्हटले की, अमित शहांनी वेगळीच स्टोरी बनवलीय. त्यांनी उत्तराखंड किंवा दुसऱ्या कुठल्या तरी राज्याचं नाव घेतलं. तिथे कलावतीच नाहीये, कलावती या महाराष्ट्रात आहेत. अमित शहांनी मुद्दा उचलला आणि तो वर जाऊन आपटला. खोटं बोला पण रेटून बोला अशातला तो प्रकार आहे. एवढ्या लहान विषयावर त्यांनी लोकसभेत लोकसभेत खोटं बोलावं हा चिंतेचा विषय आहे. अमित शहांसारखा मोठा माणूस जर असं बोलत असेल आणि ते खोटं बोलत असेल तर त्यामुळे नुकसान भाजपचं आहे.