
वृक्ष लागवडीतील अनियमिततेची चौकशी थांबवणे तसेच निलंबनाच्या प्रस्तावावर कारवाई न करण्यासाठी तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड यांना रंगेहाथ पकडण्यात आले. लखमावाड हे 2016च्या एमपीएससी परीक्षेत एनटी प्रवर्गात राज्यात पहिले आले होते.
वृक्ष लागवडीत झालेल्या अनियमिततेची चौकशी थांबवणे, निलंबनाच्या प्रस्तावावर कारवाई न करणे, वृक्ष लागवडीचे बिल देणे तसेच कर्मचाऱयांचे थकीत वेतन अदा करण्यासाठी लखमावाड याने संबंधितांकडे 45 लाख रुपये मागितले. यासंदर्भात छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली. त्यावरून लखमावाड यांना कॅनॉल रोडवरील ‘ऊर्जा हाईट’ या निवासस्थानी 45 लाख रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.
पालकमंत्री सुनेत्रा पवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतानाच अटक
बीडच्या पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार जिह्याच्या दौऱयावर असतानाच वनअधिकारी श्रीनिवास लखमावाड यांना लाच घेताना अटक करण्यात आली. यामुळे बीड जिह्यात एकच खळबळ उडाली आहे. श्रीनिवास पालकमंत्र्यांसोबत झालेल्या एका बैठकीला सकाळी उपस्थित होते. त्यानंतर घरी गेल्यावर त्यांना अटक करण्यात आली.




























































