आपण ‘मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, असे म्हणालो नाही; भास्कर जाधव यांचा फडणवीसांना टोला

राज्यातील विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार भास्कर जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. गेल्या अधिवेशनात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर डोक टेकवून मी पुन्हा या सभागृहात येणार नाही, असे आपण म्हणाला होता. याबाबत प्रश्न विचारल्यावर भास्कर जाधव म्हणाले, असे काही नाही, गैरसमज आहे तो. प्रत्येक अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, पायऱ्यांना नमस्कार करून सभागृहात जातो. आजही आमचे सदस्य पायऱ्यांवर आंदोलन करत होते. पण, आल्यावर पायऱ्यांना नमस्कार केला आणि सभागृहात गेलो. नंतर आंदोलनात सहभागी झालो. त्याच पद्धतीने सभागृहातील कामकाज संपल्यावर जाताना लोकशाहीच्या मंदिराला नमस्कार करतो, असे भास्कर जाधव म्हणाले.

त्यावेळी आपण मी पुन्हा येणार नाही, असे म्हणालो नव्हतो. आपण ‘मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, असेही म्हटले नाही. मात्र, तेव्हा निषेध नोंदवला ही गोष्ट खरी आहे. मला जाणीवपूर्वक बोलू दिल जात नव्हते. यावेळीही मला बोलू दिले जाणार नाही, असे दिसत आहे. काही लोक लोकशाहीच्या मंदिराला साष्टांग दंडवत घालतात. लोकशाहीची विटंबना करतात. त्यातील मी नाही, असेही भास्कर जाधव यांनी सांगितले.

या अधिवेशनातून शेतकऱ्यांच्या पदरात काही पडणार नाही. तरुणांच्या हाताला काही लागणार नाही. महिलांना न्याय दिला जाणार नाही. लोकशाहीची बूज राखली जाणार नाही. पाशवी बहुमताच्या अहंकारातून हे कामकाज चालवले जाईल, अशी टीकाही भास्कर जाधव यांनी सरकारवर केली आहे.