फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा भाजपला रामराम! शरद पवारांच्या पक्षात जाणार

देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय अशी ओळख असणारे मोहोळचे भाजप नेते संजय क्षीरसागर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. भाजपने आपल्याला गेल्या दहा वर्षांत सतत अपमानास्पद वागणूक दिली, त्यामुळेच आपण पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याचं क्षीरसागर यांचं म्हणणं आहे.

संजय क्षीरसागर हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. त्यांनी भाजपकडून मोहोळ विधानसभेची निवडणूक देखील लढवली होती. मात्र, गेल्या दहा वर्षांच्या काळात भाजपकडून आपल्याला कायम अपमानास्पद वागणूक मिळली. त्यामुळे आपण राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याचा आरोप क्षीरसागर यांनी केला आहे.

ते म्हणाले की, 1998-99पासून मी भाजपचा सक्रिय कार्यकर्ता आहे. जिल्हा परिषद, जिल्हा पंचायत, विधानसभा अशा अनेक निवडणुका मी लढवल्या. सामान्य जनतेवर होणाऱ्या अन्यायाविरोधात मोर्चे काढले. कठीण काळात भाजपची साथ दिली. मात्र, सध्याची राजकीय परिस्थिती अशी आहे की, मला ज्यांनी साथ दिली त्यांच्यासाठी मी काहीही करू शकलो नाही. मी चार वेळा लोकसभेची उमेदवारी मागितली, मात्र मला ती दिली गेली नाही. 2006 पासून मला पक्षात अपमानास्पद वागणूक मिळाली. 2014नंतर पक्षाची इच्छा असताना काही नेत्यांच्या दबावामुळे माझ्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. त्यामुळे जनतेला न्याय देण्यासाठी भाजप सोडण्याचा निर्णय मी घेत असून शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. तसंच प्रणिती शिंदे यांना पाठिंबा देणार आहे, अशी माहिती क्षीरसागर यांनी दिली आहे.