अतिक्रमणमुक्त मुंबईसाठी हवा पोलिसांचा बंदोबस्त!

अतिक्रमणमुक्त मुंबईसाठी पोलिसांनी आवश्यक त्या प्रमाणात आणि आवश्यक त्या वेळी पुरेशा प्रमाणात बंदोबस्त पुरवावा, असे आवाहन पालिका आयुक्त प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी आज केले. तर अतिक्रमण हटवतानाच्या संपूर्ण प्रक्रियेचे पुरावे जपून ठेवा, असे निर्देशही त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारने गठीत केलेल्या अतिक्रमण निर्मूलन (स्थायी) समितीची बैठक नुकतीच महानगरपालिका मुख्यालयात आयुक्त चहल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. मुंबईत विविध प्राधिकरण असून प्रत्येकाने समन्वय साधत अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवावी, असे निर्देश मुंबईतील विविध यंत्रणांना दिल्याचे पालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंग चहल यांनी सांगितले. विविध प्राधिकरणांच्या पातळीवर होणारी अतिक्रमण निर्मूलन कारवाई आदींची माहिती व सविस्तर तपशील योग्यरीत्या जतन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तपास व न्यायालयीन कामकाजासाठी ही माहिती महत्त्वपूर्ण ठरते. मुंबईतील विविध शासकीय यंत्रणांच्या भूखंडांवर राडारोडा (डेब्रीज) टाकला जात असल्याने विद्रुपीकरण होत आहे, त्यास आळा घालावा. महानगरपालिका आणि पोलीस यंत्रणेने विविध ठिकाणी सीसीटीव्ही बसवावेत, स्थानिक पोलीस प्रमुख आणि महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त यांनी प्राधान्याने लक्ष द्यावे, असे निर्देश चहल यांनी या वेळी दिले. या बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी तेजसिंग पवार, म्हाडाचे उपआयुक्त एस.एम. कळंबे, विमानतळ प्राधिकरणाचे सहाय्यक व्यवस्थापक संजय पाटोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त दौलत साहे, मिठागरे अधीक्षक ए.पी. मोहंती, महानगरपालिकेचे सहआयुक्त चंद्रशेखर चोरे, उपआयुक्त संजोग कबरे, सहाय्यक आयुक्त मृदुला अंडे आदी अधिकारी उपस्थित होते.