मिंध्यांचे दिवे पालिकेला ‘महागात’, सौंदर्यीकरणात 943 कोटींचा चुराडा

> देवेंद्र भगत

‘मिंधे’ सरकारच्या पुढाकाराने केवळ दिखाऊपणासाठी मुंबईत चक्क झाडांवरही केलेली लायटिंग महापालिकेला चांगलीच महागात पडल्याने रोषणाईसाठी खर्च केलेले कोटय़वधी रुपये अक्षरशः वाया गेले आहेत. सुप्रीम कोर्टाने पालिकेला झापल्यानंतर झाडांवरील लायटिंग काढण्यात येत आहे. तर रस्त्यांच्या दुतर्फा लावलेले दिवे, तोरणे बंद असून काही ठिकाणी धोकादायकरीत्या वायर लटकत आहेत. तर झालेल्या कामांची अनेक ठिकाणी दुरवस्था झाली असून सौंदर्यीकरणाची कामेही ठप्प आहेत. त्यामुळे सौंदर्यीकरणाच्या नावाखाली मुंबईकरांचा पैसा असलेल्या पालिकेच्या तिजोरीतून तब्बल 943 कोटींचा चुराडा झाला आहे.

मुंबईत ‘जी/20’ परिषदा, पंतप्रधान मोदींचा सहभाग यासाठी ‘मिंधे’ सरकारने पालिकेच्या माध्यमातून ‘मुंबई सौंदर्यीकरणा’चा उपक्रम हाती घेतला. पालिकेच्या माध्यमातून होत असलेल्या या कामांचे 8 डिसेंबर 2022 रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. मात्र यावेळी अपेक्षित प्रसिद्धी मिळाली नसल्याने पुन्हा तिसऱया दिवशी 10 डिसेंबरला पुन्हा याच 500 कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 19 जानेवारी 2023 रोजी झालेल्या विकासकामांच्या लोकार्पणावर झालेल्या ‘दहा कोटीं’च्या कार्यक्रमातही यातील काही कामांचा समावेश पुन्हा एकदा करण्यात आला. त्यामुळे सौंदर्यीकरणाची कामे सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरली आहेत. तर आता अचानक ही कामे बंद करण्यात आली असून झालेल्या कामांचीही दूरवस्था झाल्याने कोटय़वधी रुपये वाया गेल्याचे बोलले जात आहे.

सुप्रीम कोर्टाचा पालिकेला दट्टय़ा

– मुंबई सुशोभिकरण प्रकल्पांतर्गत रस्ते, पूल, पदपथ, वाहतूक जंक्शन, उद्यान, समुद्र किनाऱयांचे सौंदर्यीकरण करण्याचे नियोजित होते. याशिवाय सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, आकर्षक रंगीबेरंगी रोषणाईची कामे करण्यात आली आहेत. यामध्ये झाडांवरही लायटिंग करण्यात आली होती.

– मात्र सुप्रीम कोर्टात पर्यावरणवाद्यांकडून दाखल झालेल्या याचिकेनंतर न्यायालयाने झाडांवरील लायटिंग काढून टाकण्याचे निर्देश दिले. यानुसार सध्या मॅकेनिकल आणि इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटने या लाइट हटवण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

असा झाला खर्च

मुंबई सौंदर्यीकणात वॉर्ड ऑफिसनी 674.03 कोटी रुपये खर्च केले. तर सेंट्रल एजन्सीकडून 269.52 कोटींचा खर्च करण्यात आला. यामध्ये रस्ते दरुस्ती, डागडुजी, स्कायवॉक लायटिंग, पदपथ दुरुस्ती, ट्राफिक आयलँड सौंदर्यीकरण अशी कामे करण्यात आली.

सरकारने पैसेही दिले नाहीत

सौंदर्यीकणाच्या कामांसाठी पालिकेने 1700 कोटी खर्च करण्याचे प्रस्तावित केले होते. विशेष म्हणजे हा निधी पालिकेला देण्याची घोषणा राज्याच्या गतवर्षीच्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती. मात्र यातील एक पैसाही राज्य सरकारने पालिकेला दिलेला नाही.