रस्त्यावरील गाडय़ा हटवा… धोकादायक फांद्या तोडताना गाडीचे नुकसान झाल्यास जबाबदारी तुमची

पावसाळय़ापूर्वी पालिकेकडून रस्त्यांच्या दुतर्फा आणि आपल्या कार्यक्षेत्रातील झाडांच्या धोकादायक फांद्या तोडण्याचे काम वेगाने सुरू आहे. मात्र या कामात रस्त्यावर पार्पिंग केलेली वाहने मोठा अडथळा ठरत आहेत. त्यामुळे पालिकेला काम करण्यासाठी या गाडय़ा मुंबईकरांनी स्वतः हटवाव्यात अन्यथा झाडांच्या फांद्या तोडताना वाहनांचे नुकसान झाल्यास पालिका जबाबदार राहणार नाही, असा इशाराच पालिका प्रशासनाने दिला आहे. पालिकेने आतापर्यंत 22 हजार 334 झाडांची छाटणी पूर्ण केली असून धोकादायक झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी 4 हजार 909 खासगी सोसायटय़ांना नोटीसही बजावली.

महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीने पावसाळापूर्व खबरदारी म्हणून मोठय़ा आणि धोकादायक ठरू शकणाऱया झाडांच्या फांद्या सुयोग्य व शास्त्राrय पद्धतीने छाटणीची कामे हाती घेण्यात आली आहेत. तथापि, छाटणीच्या कामांमध्ये रस्त्याच्या कडेला लावलेल्या वाहनांचा अडथळा येत आहे. यातून अनेकदा कर्मचारी आणि वाहनधारकांमध्ये वाद झाल्याचे प्रसंग घडले आहेत. त्यामुळे निश्चित केलेल्या वेळेनुसार आपापली वाहने संबंधित ठिकाणाहून काढून सुरक्षित अशा अन्य ठिकाणी न्यावीत. फांद्या छाटणीदरम्यान दुर्दैवाने वाहनांचे नुकसान झाले तर प्रशासन त्यास जबाबदार राहणार नाही, असे स्पष्ट महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

खासगी हद्दीमधील झाडांची जबाबदारी मालकांची

दरम्यान, निमशासकीय संस्था, खासगी जागा याठिकाणी असणाऱया झाडांची निगा घेण्याची सर्व जबाबदारी ही संबंधित मालकाची किंवा वापरकर्त्याची असते. त्यामुळे, अशाप्रकारच्या खासगी जागेतील धोकादायक झाडांची छाटणी करावयाची असल्यास संबंधित उद्यान अधिकाऱयांशी संपर्क साधावा.

मुंबईतील झाडांची स्थिती

– पालिका क्षेत्रात 29 लाख 75 हजार झाडे आहेत. यापैकी 15 लाख 51 हजार 132 एवढी झाडे खासगी संस्थांच्या आवारांमध्ये आहेत. तर 10 लाख 67 हजार 641 झाडे शासकीय इमारती तसेच आस्थापनांच्या परिसरांमध्ये आहेत.
– एकूण झाडांपैकी 1 लाख 86 हजार 246 झाडे ही रस्त्यांच्या कडेला आहेत. त्यापैकी 1 लाख 48 हजार 169 हजार झाडांची छाटणी अपेक्षित आहे. त्यापैकी 19 एप्रिल अखेरपर्यंत 22 हजार 334 झाडांची छाटणी झाली आहे.
– तर 7 जून 2024 अखेरपर्यंत उर्वरित झाडांची छाटणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट उद्यान विभागाने ठेवले आहे. मृत आणि कीड लागलेली 433 झाडे सर्वेक्षणात आढळल्याचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी सांगितले.