सिनेविश्व – अक्षयकुमारचा सुपरहिटचा फॉर्म्युला

>> दिलीप ठाकूर

तुम्ही म्हणाल, ‘बाहुबली’पासून (2014) दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपट तिकडील अन्य भाषा आणि हिंदीत डब होऊन अतिशय थाटात प्रदर्शित होण्याचा ट्रेण्ड छान रुजलाय आणि त्यात ‘बाहुबली 2’, ‘पुष्पा’, ‘कांतारा’, ‘अॅनिमल’ यांच्या खणखणीत यशाने आता हा ट्रेण्ड छान स्थिरावलाय, तर मग अक्षय कुमार तेलुगू चित्रपटातून भूमिका साकारतोय यात ‘ब्रेकिंग न्यूज’ कसली? त्याला सध्याच्या ‘पडत्या काळात’ हिट पिक्चर नको काय? तुमचा प्रश्न अगदीच चुकीचा आहे, असं अजिबात म्हणायचे नाही, पण काही गोष्टी समजून तर घ्या.

मराठी काय नि हिंदी काय, या चित्रपटसृष्टीतून दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपटांतून भूमिका साकारणे नवीन नाही. इधर का कलाकार उधर और उधर का कलाकार इधर. हे अनेक वर्षे सुरू आहे. सहज सांगायचं म्हटलं तरी सचिन खेडेकर, सयाजी शिंदे, नेहा पेंडसे, श्रुती मराठे वगैरे अनेक महाराष्ट्रीय कलाकारांनी कन्नड, तामीळ, तेलुगू, मल्याळम भाषेतील चित्रपटांतून भूमिका साकारत आपले अनुभवविश्व समृद्ध केले. नव्वदच्या दशकात मनीषा कोईराला, उर्मिला मातोंडकर, सोनाली बेंद्रे यांनीही तामीळ भाषेतील चित्रपटांतून भूमिका साकारलीय.

असं असलं तरी शाहरुख खान, सलमान खान, आमीर खान, अक्षय कुमार असे सर्व नायक हिंदी चित्रपटाचे म्हणून ओळखले जातात. बरं, दक्षिणेकडे असेच त्यांचे आपले हुकमी भारी हीरो आहेतच. बघा पटतंय का? कमल हसन, रजनीकांत, मोहनलाल, मामुट्टी, प्रभास, अल्लू अर्जुन, जोसेफ प्रभास, सूर्या, विक्रम, महेशबाबू, पवन कल्याण, रामचरण, विजय सेतुपती, एन. टी. रामाराव ( ज्युनियर), सुदीप, कार्थी, फवाध फासील, रवी तेजा, राजा दग्गुबत्ती… प्रत्येकाची जबर क्रेझ! फिटनेस, मारहाण दृश्यं, नृत्य चपळता, सेक्स अपील यात सगळेच माहीर. तिकडच्या सर्वच आघाडीच्या तारका या तगडय़ा नायकांच्या नायिका होण्यास उत्सुक. यात अक्षय कुमारला वाव-भाव तो किती? दक्षिणेकडील नायकांचे हिंदी डबिंग आपण स्वीकारतो (‘पुष्पा’साठी श्रेयस तळपदेने केले), पण अक्षय काय, शाहरुख, सलमान काय, दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील पडद्यावर बोलतायत (तेही तिकडच्या डबिंग आर्टिस्टच्या आवाजात) हे रसिक मनाला कसे पटेल? भरपूर पैसे मिळताहेत, पिक्चरमध्ये जमिनीवरील, हवेतील, पाण्यातील भरपूर साहसी दृश्यं आहेत, उघडय़ा, निधडय़ा केसाळ छातीचे दर्शन आहे.

हा पिक्चर दक्षिणेकडील अन्य प्रादेशिक भाषांत व हिंदीतही डब होणार आहे (तेव्हा आवाज खुद्द अक्षय कुमारचाच असेल) आणि आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीला जगभरातील अनेक भाषांतील चित्रपट एन्जॉय करायची सवय झालीय. तर मग आपण तेलुगू भाषेतील चित्रपटात भूमिका करतोय यात गैर ते काय अशी अक्षय कुमारची भूमिका असू शकते. अलीकडे अक्षयचे अनेक चित्रपट रसिकांनी नाकारलेत. ते कुठेतरी थांबावे म्हणून हुकूमी सुपरहिटचा फॉर्म्युला हवाय. तो ‘कन्नापा’ या तेलुगू चित्रपटात असेल याची अक्षयला खात्री असणारच. कारकीर्दीच्या साडेतीन दशकांनंतर तेवढे व्यावसायिक भान अक्षयला नसेल असे कसे म्हणणार?

[email protected]
(लेखक सिनेपत्रकार व समीक्षक आहेत)