कॅल्शियम… हाडांच्या पोषणासाठी

चाळिशी झाली तर पॅल्शियम घ्यायला सुरुवात करा असा आजकाल सगळीकडे एक समज झालेला आहे. खरं तर आपली दिनचर्या, आहार, विहार यांच्यामधील होणाऱया चुका सुधारणे जास्त योग्य. आहारातील हाडांचे पोषण सुधारण्याचे उपाय पाहू.

थंडीमध्ये रोज रात्री लसूण चटणी (लसूण आणि सुके खोबरे एकत्र करून तयार केलेली) एकवेळ जेवणासह चमचाभर तरी खावी (आम्लपित्त वगैरे असलेल्यांनी टाळावे.)

– गव्हाचे सत्त्व (गव्हाचा चीक) 1 चमचा, 1 कप पाणी आणि 1 कप दुधात शिजवून फक्त दूध शिल्लक ठेवावे. ही खीर बदाम, वेलची आणि जायफळ पूड पाव-पाव चमचा घालून खावी. आठवडय़ातून दोनवेळ करणे उत्तम. गव्हाचे गरम गरम ताजे फुलके तूप लावून रोज एकवेळ आहारात ठेवावेत. हाडांचे पोषण उत्तम होते. आम्लपित्त त्रास असणाऱयांनी गव्हाचे गरम गरम फुलके तूप लावून पडवळ, दुधी, दोडका, भेंडी यापैकी भाज्यांबरोबर खावी.

– मेथी दाणे, डिंक यांचे तिळगुळाचे आकाराएवढे लाडू बनवून थंडीमध्ये आठवडय़ातून तीनवेळ एक-एक लाडू तरी खावा. सोबत कोमट दूध प्यावे. मेथी पाने आणि गहू यांचा थेपला बनवून खाण्यात ठेवावा.

– कडीपत्ता, जवस, कारळे, तीळ यांपैकी कोणतीही एक चटणी रोज एकवेळ जेवणासह अर्धा ते एक चमचा खावी. याने पचन सुधारते.

– पाच बदाम, दोन पिस्ता, एक अक्रोड, एक खजूर, पाच मनुका हे नियमितपणे रात्री जेवणानंतर खाल्ले तर संपूर्ण शरीराचे पोषण लगेच सुधारते.

– सकाळी उठून रिकाम्या पोटी चार ते सहा चमचे गायीचे साजूक तूप प्यावे. त्यावर हळद एक चमचा आणि गरम पाणी एकत्र करून प्यावे. याने रक्त, हाडे, मज्जा, त्वचा यांचे सर्वोत्तम पोषण होते. पित्ताचा जोर तुटतो, वार्धक्य येणे लांब जाते. बुद्धीची कार्यक्षमता वाढते.

– तेलाचे बस्ती (एनिमासारखे, परंतु कमी प्रमाणात तेल गुदा भागातून आतडय़ात सोडणे). हा प्रकार वाताचे रोग कमी करणे, वार्धक्य लांबवणे, हाडांचे पोषण सुधारणे यात उत्तम काम करतो. यासाठी वैद्यांचा सल्ला जरूर घ्यावा.

तेल मालीश
– शरीरास तेल मालीश करणे हा हाडांचे पोषण करण्याचा अजून एक सर्वात सोपा मार्ग आहे. यासाठी सलगपणे मालीश करण्याची सवय हवी. आठवडय़ातून दोनवेळ किमान सर्वांगास मालीश करून कोमट पाण्याने अंघोळ करावी. दोन महिन्यांत हाडांचे पोषण होणे सुरू होते.

– नाकात तेल किंवा तूप सोडणे, कानात तेल सोडणे हेही प्रकार. याच प्रकारे स्थानिक स्तरावर विविध हाडांची, सांध्यांची पोषण क्रिया पूर्ण करतात, ज्याचा फायदा हाडांनाही होतो.

– एवढे सर्व करूनही जेव्हा रक्तातील कॅल्शियम किंवा व्हिटॅमिन ‘डी’ जर कमी दिसत असेल तर तेव्हा कृत्रिम स्वरूपात त्यांचे सेवन गरजेपुरते घेणे योग्य ठरते. सोबत आपल्या वैद्यांना विचारून त्यासाठी आयुर्वेदीय औषधे आधी निवडावीत. नैसर्गिक गोष्टी (कृत्रिम गोष्टींपेक्षा) वापरणे जास्त उत्तम. शरीराला फुकटच्या पोषणावर जगण्यापेक्षा आहारातून मिळालेल्या पोषणाला पचवण्यासाठी सक्षम बनवणे अधिक योग्य असते हे विसरू नये.

>> वैद्य सत्यव्रत नानल
[email protected]