कठोर पावले उचला; महाराष्ट्रासह आठ राज्यांना केंद्राचा आदेश

देशभरात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महाराष्ट्रासह आठ राज्यांना सतर्क करत विशेष सूचना जारी केल्या आहेत. राज्यांनी आपापल्या परीने कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी तातडीने कठोर पावले उचलावीत जेणेकरून तिसरी लाट घातक होण्यापासून रोखता येईल.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्र, दिल्ली, हरयाणा, तामीळनाडू, पश्चिम बंगाल, गुजरात, कर्नाटक आणि झारखंडला याबाबत पत्र लिहून निर्देश दिले आहेत. कोरोना आणि ओमायक्रोन व्हेरिएंटचा समूह संसर्ग वाढणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी. मृत्यूदर वाढू नये यासाठी कठोर पावले उचलावीत. तसेच कोरोना चाचणी आणि लसीकरणाचा वेग वाढवण्याचा सल्लाही दिला आहे. दिल्लीत लागू करण्यात आलेले ‘जीआरएपी’ मॉडेल
संपूर्ण देशात आणण्याचाही विचार केला जात आहे.