Mega Block Sunday मध्य मार्गावर 24 तासांचा मेगाब्लॉक, हार्बर मार्गावरही दुरुस्तीचे काम

रविवार 2 जानेवारी 2022 रोजी मध्य रेल्वे ठाणे-दिवा मार्गावर 24 तासांचा मेगाब्लॉक घेणार आहे. या मार्गावरील पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम सध्या सुरू असून यासाठी हा जंबो मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी मध्यरात्री 2 वाजल्यापासून ते सोमवारी मध्यरात्री दोन वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.

एक जानेवारीला रात्री 11.43 पासून ते दोन जानेवारीला रात्री 11.43 पर्यंत सीएसएमटीकडे जाणाऱ्या कल्याणहून सुटणाऱ्या अप आणि जलद गाड्या कल्याण आणि मुलुंड दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या गाड्या ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा आणि कळवा स्थानकावर थाबंणार नाहीत. पुढे मुलंड स्थानकावर अप धीम्याा मार्गावर पुन्हा वळवल्या जातील. त्यामुळे या सर्व लोकल नियोजित वेळेपेक्षा दहा मिनिटे उशीराने पोहोचतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून निघणाऱ्या डाऊन धीम्या, अर्ध जलद सेवा मुलुंडहून 2 जानेवारी रोजी 5.05 पासून ते 3 जानेवारी मध्यरात्री 1.15 पर्यंत मुलुंड व कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर धावतील. या लोकल कळवा, मुंब्रा, कोपर व ठाकुर्ली स्थानकावर थांबणार नाहीत, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.

हार्बर मार्गावर दुरुस्तीचे काम

हार्बर मार्गावरही पाच तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पनवेल-वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर रविवारी दुपारी 11.05 वाजल्यापासून ते दुपारी 4.05 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. यादरम्यान बेलापूर- खारकोपर सेवा उपलब्ध असेल; मात्र नेरुळ- खारकोपर सेवा रद्द राहील, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.

पनवेल येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.16 या वेळेत बेलापूर/पनवहार्बी सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत ठाण्याकरिता सुटणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाण्याहून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 या वेळेत पनवेलसाठी सुटणा-या डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

नेरळहून सकाळी 11.40 ते दुपारी 3.45 वाजेपर्यंत खारकोपरसाठी सुटणारी हार्बर मार्गावरील सेवा आणि खारकोपरहून दुपारी 12.25 ते 4.25 वाजेपर्यंत नेरूळसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

खारकोपर-बेलापूर सेवा वेळापत्रकानुसार चालणार आहे. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-वाशी सेक्शनवर विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ दरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल.