
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱया चाकरमान्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने मुंबई ते मडगावदरम्यान आणखी चार विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेत गणेश चतुर्थीच्या आधी म्हणजेच 11 सप्टेंबर आणि 13 सप्टेंबरला विशेष गाड्या मुंबईहून सुटणार आहेत. या गाडय़ांचे आरक्षण शनिवारी खुले होईल, असे मध्य रेल्वे प्रशासनाने जाहीर केले.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशा मार्गावर विशेष गाडीच्या चार फेऱया चालवण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक 01007 विशेष गाडी 11 सप्टेंबर आणि 13 सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री 12.40 वाजता सुटेल आणि मडगाव येथे दुसऱया दिवशी 3.30 वाजता पोहोचेल. तसेच गाडी क्रमांक 01008 विशेष गाडी 11 सप्टेंबर आणि 13 सप्टेंबर रोजी मडगाव येथून दुपारी 4.30 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱया दिवशी सकाळी 8.15 वाजता पोहोचेल. विशेष गाडीला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी आणि करमळी या स्थानकांवर थांबा असेल. या गणपती स्पेशल गाडय़ांचे आरक्षण सर्व पीआरएस पेंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर 29 ऑगस्ट रोजी सुरू होईल, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनामार्फत देण्यात आली.























































