शीव उड्डाणपूल उद्या रात्रीपासून पाडणार, पुढचे दीड वर्ष वाहतूककोंडी

मध्य रेल्वेच्या जीर्ण झालेल्या शींव उड्डाणपूल बुधवार, 27 मार्चच्या रात्री 12 वाजल्यापासून पाडण्यात येणार आहे. यानंतर पूल नव्याने बांधणे, रेल्वेच्या पाचव्या, सहाव्या मार्गिकेचे बांधकाम यामुळे सुमारे दीड वर्ष मुंबईकरांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान, पूल नसल्याने होणारी वाहतूककोंडी पह्डण्यासाठी पालिका वाहतुकीचे नियोजन करणे, बॅरिकेड्स, दिशादर्शक फलक लावणे या कामासाठी 14 कोटींचा खर्चही करणार आहे.

अंधेरीत 3 जुलै 2018 रोजी गोखले पूल कोसळून दोन जणांचा आणि 14 मार्च 2019 रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील ‘हिमालय’ पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत 7 जणांचा बळी गेल्यानंतर मुंबईतील पुलांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यामुळे पालिकेने मुंबईतील सर्व पुलांचे नव्याने स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती आणि काही पूल पाडून नव्याने तर नागरिकांच्या मागणीनुसार काही पूल नवीन बांधण्यात येत आहेत. यानुसार मध्य रेल्वे मार्गावरील शीव स्थानकातील 110 वर्षे जुना ब्रिटिशकालीन रोड ओव्हर पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. त्यामुळे रोड ओव्हर पूल पाडून नव्याने पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. शीव पुलाच्या कामासाठी वाहतूक पोलिसांची परवानगी मिळाली आहे, मात्र 4 जानेवारीपर्यंत माहीमची जत्रा असल्याने जत्रा संपल्यानंतर पुलाचे पाड काम आणि पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात येईल, असे पालिका व रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले, मात्र त्यानंतर दहावी व बारावीच्या परीक्षा असल्याने परीक्षा संपल्यानंतर पुलाचे काम हाती घेण्यात येईल असे जाहीर करण्यात आले होते.

असे होणार बेस्ट मार्गांमध्ये बदल

– 11 मर्यादित ही बस कलानगरमार्गे टी जंक्शन व सुलोचना शेट्टी मार्गाने सायन हॉस्पिटलमार्गे नेव्ही नगर येथे जाईल. z 181, 255 म.348 म. 355 म. या बस कलानगरमार्गे टी जंक्शन व सुलोचना शेट्टी मार्गाने सायन हॉस्पिटल सायन सर्कलमार्गे जातील. z बस क्र. ए 376 ही सायन सर्कलहून सायन हॉस्पिटल सुलोचना शेट्टी मार्गाने बावरी पॅम्पमार्गे माहीम येथे जाईल. z सी 305 ही बस धारावी आगारहून पिवळा बांगला टी जंक्शन व सुलोचना शेट्टी मार्गाने सायन हॉस्पिटलहून बॅकबे आगार येथे जाईल. z बस क्र. 356 म, ए 375 व सी 505 या बस कलानगर बीकेसीहून प्रियदर्शनी येथे जातील.

– बस क्र. 7 म, 22 म, 25 म व 411 या बस महाराष्ट्र काटा, धारावी आगारहून पिवळा बांगला टी जंक्शन व सुलोचना शेट्टी मार्गाने सायन हॉस्पिटलमार्गे जातील. z बस क्र. 312 व ए 341 या बस महाराष्ट्र काटा, धारावी आगारहून पिवळा बांगला टी जंक्शन व सुलोचना शेट्टी मार्गाने सायन हॉस्पिटल, सायन सर्कलमार्गे जातील. बस क्र. एसी 72 भाईंदर स्थानक ते काळा किल्ला आगार व सी 302 ही बस मुलुंड बस स्थानक ते काळा किल्ला आगार येथे खंडित करण्यात येईल. बस क्र. 176 व 463 या बस काळा किल्ला आगार येथून सुटतील व सायन स्थानक 90 फूट मार्गाने लेबर पॅम्प मार्गाने दादर-माटुंगा स्थानकाकडे जातील. z बस क्र. एसी 10 जलद, ए 25 व 352 या बसगाडय़ा राणी लक्ष्मीबाई चौक येथे खंडित करण्यात येथील व तेथूनच सुटतील.

असे होणार पुलाचे काम

शीव रेल्वेवरील रोड ओव्हर पूल सद्यस्थितीत 40 मीटर लांब आहे. तो 51 मीटरपर्यंत वाढवण्यात येणार आहे. अहवालानुसार हा पूल दोन स्पॅनवर असून त्याचा एक खांब रेल्वे मार्गावर आहे. नवीन पूल एकाच स्पॅनवर असेल आणि रेल्वे मार्गावर खांब नसेल.

मध्य रेल्वेने पालिकेच्या समन्वयाने या पुलाची पुनर्बांधणी व नवीन रस्ता बांधण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन रोड ओव्हर पूल बांधणीसाठी मध्य रेल्वे 23 कोटी रुपये तर नवीन रस्ता बांधण्यासाठी मुंबई महापालिका 26 कोटी रुपये खर्च करणार आहे.