
राज्यात सुरू असलेल्या विशेष मतदार पुनरिक्षण मोहिमेत (एसआयआर) मतदारांनी आपल्या नावाची तपासणी व नोंदणी करणे आवश्यक आहे. न केल्यास मतदार यादीमधून नावे वगळली जातील आणि मग संबंधित नागरिकांना कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घेता येणार नाही. कारण आता पॅनकार्डप्रमाणे मतदान कार्डही आधारकार्डला जोडले जाणार आहे, असे विधान महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल्याने मतदारांना धडकी भरली आहे. मतदार यादीत नाव नसल्यास भविष्यात अन्नधान्य योजना, रेशनिंग आणि महिला बालविकास विभागाच्या शासकीय योजनांचा लाभ बंद होऊ शकतो.
महाराष्ट्रात 30 जूनपासून एसआयआरला सुरुवात झाली आहे. यामध्ये घरोघरी तपासणी करून पात्र मतदारांची नावे नोंदवली जात आहेत. मतदार यादी त्यानुसार अद्ययावत केली जाणार आहे. त्यासाठी बूथ लेव्हल अधिकारी (बीएलओ) घरोघरी जाऊन मतदारांच्या माहितीची सत्यता तपासतात. 17 ऑगस्टपर्यंत ते काम चालणार आहे.
– एसआयआर मोहीम पूर्ण झाली की सर्व जुन्या मतदार याद्या रद्द केल्या जातील. तसेच पुढील 20 वर्षे तरी नवीन मतदार याद्या तयार होणार नाहीत. त्यामुळे या 20 वर्षांत मतदानही करता येणार नाही आणि कोणतेही शासकीय लाभ मिळणार नाहीत अशी अवस्था होणार आहे. त्यामुळे मतदारांना एसआयआरच्या माध्यमातून एक संधी मिळाली आहे, असे बावनकुळे म्हणाले. येत्या काळात वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱया मुलामुलींची नावे मतदार यादीत कशी समाविष्ट करणार याबाबत मात्र बावनकुळे यांनी काहीच स्पष्ट केले नाही.
































































