
लग्नाचे खोटे आश्वासन देऊन विविध व्यक्तींविरुद्ध बलात्काराचे खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून खंडणी उकळणाऱ्या 34 वर्षीय महिलेला मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांनी एका प्रकरणात टूर मॅनेजरविरुद्धचा बलात्काराचा गुन्हा रद्द करतानाच संबंधित महिलेकडून भविष्यात कोणतीही तक्रार प्राप्त झाल्यास, पोलिसांनी थेट गुन्हा नोंदवू नये, तर कायद्यानुसार आधी सखोल प्राथमिक चौकशी करावी असे आदेश पोलिसांना दिले. सहार पोलीस ठाण्यात 2019 मध्ये एका महिलेने एका टूर मॅनेजरविरुद्ध बलात्काराची तक्रार केली होती. लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप तिने केला होता. याविरोधात याचिकाकर्त्याने हायकोर्टात ऍड. अर्जुन कदम यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती.






























































