
मागील काही दिवसांपासून खोल समुद्रात मासेमारीला असलेली बंदी उठणार असून १ ऑगस्ट २०२६ पासून खोल समुद्रातील विशेष आर्थिक क्षेत्रात म्हणजेच किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपुढील खोल समुद्रात मासेमारीला परवानगी देण्यात आली आहे. मात्र, किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपर्यंतच्या महाराष्ट्राच्या प्रादेशिक जलक्षेत्रात १५ ऑगस्टपर्यंत मासेमारीवरील बंदी कायम राहणार आहे.
पावसाळा हा बहुतांश सागरी माशांच्या प्रजननाचा काळ असल्यामुळे दरवर्षी या काळात मासेमारीवर बंदी घातली जाते. यामुळे माशांची संख्या वाढण्यास मदत होते आणि भविष्यात मत्स्यसंपत्ती टिकून राहते. यंदा राज्य शासनाने यांत्रिक आणि यंत्रचलित मासेमारी नौकांसाठी १ जून ते १५ ऑगस्ट या कालावधीत बंदी लागू केली आहे; तर केंद्र शासनाने खोल समुद्रातील विशेष आर्थिक क्षेत्रात ३१ जुलैपर्यंत बंदी लागू केली होती. त्यामुळे १ ऑगस्टपासून या क्षेत्रात मासेमारीला परवानगी मिळणार आहे. यंदा महाराष्ट्र शासनाने ही बंदी १५ ऑगस्टपर्यंत म्हणजे ७६ दिवस लागू केली आहे, ती बंदी कायम आहे. मत्स्यव्यवसाय विभागाने मच्छीमारांना विशेष आर्थिक क्षेत्रात म्हणजेच १२ सागरी मैलांपुढे मासेमारी करताना लागू असलेल्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.



























































