Ashes 2023 – हेडनं सावरलं, ब्रॉड-वोक्सने गुंडाळलं; इंग्लंडला विजयासाठी 224 धावांची गरज

पहिल्या डावामध्ये नाममात्र 26 धावांची आघाडी घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव इंग्लंडने 224 धावांमध्ये गुंडाळला. शनिवारी पावसाच्या व्यत्ययामुळे पहिल्या दोन सत्रांचा वेळ वाया गेल्यानंतरही तिसऱ्या सत्रात जोरदार कमबॅक करत इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना वेसन घातले. हेडने एक बाजू लावून धरत 77 धावांची झुंझार खेळी केली, मात्र त्याच्या व्यतिरिक्त एकही फलंदाज 50 धावांचा आकडाही पार करू शकला नाही.

दुसऱ्या दिवशीच्या 4 बाद 90 धावांवरून ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव सुरू केला. पहिल्या डावातील शतकवीर मिशेल मार्श 28 धावा करून बाद झाला, त्यापाठोपाठ यष्टीरक्षक फलंदजा कॅरीही 5 धावा काढून आल्या पावली माघारी परतला. दुसऱ्या बाजूने हेडने तळाच्या फलंदाजांना हाताशी धरत फटकेबाजी केली. त्याने 3 षटकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 77 धावा केल्या. इंग्लंडकडून ब्रॉड आणि वोक्सने प्रत्येकी 3, तर वूड आणि मोईन अलीने प्रत्येकी दोन बळी घेतले.

ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर विजयासाठी 251 धावांचे आव्हान ठेवले आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने एकही गडी न गमावता 27 धावांपर्यंत मजल मारली होती. इंग्लंडला आता विजयासाठी 224 धावांची गरज आहे. मात्र चौथ्या दिवशी ढगाळ वातावरण राहिल्यास ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज इंग्लंडवर वर्चस्व गाजवू शकतात. ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकल्यास एशेसमध्ये ते 3-0 अशी विजया आघाडी घेतील.