इंग्लंडच्या संघाला हिंदीसोबत क्रिकेटही शिकवू, चाहत्याच्या मागणीला रवी शास्त्रींचे उत्तर

इंग्लंड आणि नेदरलँड यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान एका प्रेक्षकाने पोस्टर झळकावत इंग्लंडच्या संघाला खिजवण्याचा प्रयत्न केला होता. या पोस्टरवर त्याने लिहलं होतं ‘इंग्लंडला हिंदुस्थानी प्रशिक्षकाची गरज आहे’. जेव्हा कॅमेरामनने हे पोस्टर  दाखवले तेव्हा सामन्याचे समालोचन करत असलेल्या इंग्लडचा माजी कर्णधार इऑन मॉर्गनने हिंदुस्थानी संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींना त्यांचे मत विचारले. यावर शास्त्रींनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले. हे उत्तर सध्या व्हायरल झाले आहे.

गतविजेत्या इंग्लंड संघाला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत म्हणावी तशी कामगिरी करता आलेली नाहीये. 2019 मध्ये तुफान फॉर्मात असलेल्या इंग्लडने न्यूझीलंडचा चुरशीच्या लढतीत पराभव केला होता आणि पहिल्यांदा विश्वचषकावर आपलं नाव कोरलं होतं. 2023 मध्ये भारतात सुरु असलेल्या विश्वचषकात तोच जोश घेऊन जॉस बटलरचा संघ मैदानात उतरेल अशी अपेक्षा चाहत्यांना होती. पण इंग्लंड संघाच्या खेळाडूंनी क्रिकेटरसिकांची सपशेल निराशा केली. नेदरलँड आणि बांग्लादेश हे दोन दुबळे संघ सोडले तर इतर कोणत्याही मातब्बर संघाविरुध्द इंग्लंडला विजय मिळवता आलेला नाहीये.

इंग्लडने नेदरलँडला 160 धावांनी हरवत विश्वचषकातील आपला दुसरा विजय साजरा केला. त्यामुळे 2025 मध्ये होणाऱ्या चैंपियंस ट्रॉफी खेळण्याच्या दृष्टीने इंग्लडच्या आशा अजूनही कायम आहेत. या सामन्यादरम्यान एका प्रेक्षकाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारे पोस्टर झळकावले होते. या पोस्टरवर लिहलं होतं की ‘इंग्लंडला हिंदुस्थानी प्रशिक्षकाची गरज आहे’. जेव्हा इऑन मॉर्गनने, रवी शास्त्रींना याबाबत त्यांचे मत विाचरले. तेव्हा रवी शास्त्री म्हणाले की, ‘हां, आम्हाला बोलवा, आम्ही सर्वांना हिंदी शिकवू’. इऑन मॉर्गनला त्याचा इंग्रजीत अर्थ सांगताना ते म्हणाले, ‘मला म्हणायचे आहे – होय, मोस्ट वेलकम. मी सर्वांना हिंदी शिकवेन आणि थोडे क्रिकेटही शिकवेन, काही हरकत नाही.

या गंमतीदार क्षणाचा व्हिडीओ आयसीसीने त्यांच्या सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. आणि तो मोठ्या प्रमाणात व्हायरल सुध्दा झाला आहे.