चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इंग्लंडच्या आशा कायम , स्टोक्सचे शतक; नेदरलॅण्ड्सचा धुव्वा

>> मंगेश वरवडेकर

वर्ल्ड कपमधील आव्हान साखळीतच संपुष्टात आल्याची नामुष्की सहन करणाऱया जगज्जेत्या इंग्लंडने चॅम्पियन्स ट्रॉफीतील आपले आव्हान कायम राखताना नेदरलॅण्ड्सचा 160 धावांनी पराभव केला. या विजयासह त्यांनी आपली सलग पाच पराभवांची मालिकाही संपुष्टात आणत वर्ल्ड कप गुणतालिकेत सातव्या स्थानी झेप घेतली आहे. तसेच नेदरलॅण्ड्स सहाव्या पराभवामुळे वर्ल्ड कपमधून बाद होणारा चौथा संघ ठरला आहे. मात्र डच संघाला चॅम्पियन्स ट्रॉफीत स्थान मिळविण्याची अंधुकशी आशा असून त्यांना अखेरच्या साखळी सामन्यात हिंदुस्थानला नमवण्याचा चमत्कार करावा लागणार आहे.

बेन स्टोक्स आणि डेव्हिड मलानच्या झंझावातामुळे इंग्लंडने 340 धावांचे आव्हान उभारले तेव्हाच अर्धी लढाई जिंकली होती आणि ख्रिस व्होक्स आणि डेव्हिड विलीने आघाडीच्या फलंदाजांना सुरुवातीलाच तंबूत धाडत विजयाचा मार्ग तयार केला. त्यानंतर मोईन अली आणि आदिल राशीदने नेदरलॅण्ड्सच्या मधल्या आणि तळाच्या फलंदाजांना टप्प्याटप्प्याने बाद करत 179 धावांतच संपवले. तळाला तेजा निदामनुरूने 3 षटकार ठोकत इंग्लंडचा विजय लांबवण्याचा प्रयत्न केला होता. पण तो अन्य फलंदाजांनी यशस्वी होऊ दिला नाही. अली आणि राशीदने प्रत्येकी 3 विकेट टिपले.

त्याआधी वर्ल्ड कपमधील निराशाजनक कामगिरीनंतर इंग्लंडच्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील पात्रतेवरही संकट आले होते. ते संकट दूर करण्यासाठी आजही इंग्लंड फार त्वेषाने खेळला नाही. शेवटच्या दहा षटकांत बेन स्टोक्सच्या बॅटीतून निघालेल्या चौकार-षटकारांच्या आतषबाजीमुळे त्यांना 124 धावा ठोकता आल्या आणि स्टोक्सनेही वर्ल्ड कपमधील आपले पहिले शतक झळकावले. स्टोक्सने 84 चेंडूंत 6 चौकार आणि 6 षटकार खेचत नाबाद 108 धावा ठोकल्या. 58 धावांत पन्नाशी गाठणाऱया स्टोक्सने पुढील 20 चेंडूंत पन्नास धावा केल्या.

इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, पण त्यांचा जॉनी बेअरस्टॉ (15), ज्यो रूट (28), हॅरी ब्रुक (11) आणि जोस बटलर (5) यांनी आजही निराश केले. केवळ डेव्हिड मलानने खणखणीत 87 धावा केल्या, पण तो स्टोक्सच्या चुकीमुळे धावचीत झाला. मात्र त्यानंतर स्टोक्सने व्होक्सबरोबर सातव्या विकेटसाठी 129 धावांची भागी रचत इंग्लंडला त्रिशतकी टप्पा गाठून दिला.