पाण्यासाठी शेतकऱ्यांचा टाहो; 13 गावांचा भाजपला मतदान न करण्याचा निर्णय

नीरा उजवा कालवा आणि भाटघर धरणातील हक्काच्या पाण्यापासून शेतकऱ्यांना वंचित ठेवल्याने 13 गावातील मतदारांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या महिनाभरापासून नीरा आणि भाटघरचे पाणी पंढरपूर तालुक्यात सुरु आहे. मात्र, राजकीय हस्तक्षेप होत असल्याने सोनके, गादेगाव, तीसंगी, पळशी, वाखरी भंडीशेगाव, शेळवे, भवाळी, खर्डी, उंबरगाव, कोर्टी आदी 13 गावे या पाण्यापासून वंचित आहेत.

हे पाणी मिळावे यासाठी लोकप्रतिनिधींचे अनेकवेळा लक्ष वेधले. मात्र, आश्वासनाशिवाय काहीही पदरात पडले नाही. शेतीच्या पाण्याचे तर दूर लोकांना आणि जनावरांना पिण्यासाठी पाणी नसल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते समाधान फटे यांनी केली आहे. आर्थिक भ्रष्टाचार आणि राजकीय दबावापोटी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी 10 नंबर फाट्यावरील ओढे नाले, शेततळी भरुन दिली आहेत. मात्र, त्यावरील फाट्याला मात्र नेत्यांनी आणि अधिकाऱ्यांनी फाटा मारल्याने 13 गावातील शेतकरी एकवटले असून येत्या दोन दिवसांत फाटा क्रमांक 7 आणि 8 सुरु न केल्यास लोकसभा निवडणुकीत एकही मतदार भाजपला मतदान करणार नसल्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे.

पाणीदार खासदार…
भाजपचे खासदार निंबाळकर हे स्वतःला पाणीदार खासदार म्हणून उपाधी लावतात. त्यांच्या मतदारसंघातील हजारो शेतकरी पाण्यासाठी टाहो फोडत आहेत. पाणीदार खासदार म्हणून घेण्याची हौस असेल तर आधी पाणी द्या, अशी मागणी 13 गावातील शेतकऱ्यांनी केली आहे.