सराईत चोरट्यांकडून चोरीच्या चार दुचाकी जप्त; बंडगार्डन पोलिसांची कामगिरी

पुणे शहर परिसरात दुचाकी चोरणार्‍या चोरट्यांना जेरंबद करीत त्यांच्याकडून चोरीच्या चार दुचाकी जप्त करण्यात बंडगार्डन पोलिसांना यश आले. आरोपींकडून विविध पोलीस ठाण्यातील चार गुन्हे उघडकीस आले आहेत.

अभिजीत आदेश आडसूळे (22, रा. घोरपडी), सादिक युनिस पटेल (18, रा. कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. अटक करण्यात आलेले आरोपी रेकॉर्डवरील आहेत. बंडगार्डन पोलिसांचे पथक हद्दीत गस्तीवर होते. या दरम्यान पुणे स्टेशन चौकात दोघेजण संशयीतरित्या थांबल्याची माहिती पथकाला मिळाली. यानूसार सापळा रचून दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या दुचाकीची तपासणी केली असता डिक्कीमध्ये लोखंडी कोयता मिळून आला. यानूसार त्यांच्यावर बंडगार्डन पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासादरम्यान त्यांनी शहरातील विविध भागातून दुचाकी चोरल्याचे समोर आले. त्यांच्याकडून पोलिसांची चोरीच्या चार दुचाकी जप्त केल्या असून वारजे, बंडगार्डन, तळेगाव दाभाडे, खारघर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचे गुन्हे उघड झाले आहेत. पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, पोलीस निरीक्षक आश्विनी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रविंद्र गावडे, अंमलदार अमोल सरडे, शिवाजी सरक, ज्ञाना बडे, मनोज भोकरे, ज्ञानेश्वर गायकवाड, सतीश मुंढे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.