फ्रान्समध्ये Iphone12 च्या विक्रीवर बंदी, रेडिएशन मानवासाठी घातक असल्याचा दावा

Apple iPhone ची क्रेझ जगभर पाहायला मिळत आहे आणि अलीकडेच कंपनीने iPhone 15 बाजारात आणला आहे. एकीकडे अनेक देशांत ग्राहक आयफोनवर उड्या मारत असताना दुसरीकडे फ्रान्समध्ये आयफोन 12च्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. अ‍ॅपल कंपनीला हा मोठा हादरा असल्याचे मानले जात आहे. एजन्सी ऑफ नॅशनल फ्रिक्वेन्सीज (ANFR) ने आयफोनमधून बाहेर पडणारे रेडिएशन हे मानवासाठी धोकादायक असल्याचे म्हटले आहे. यामुळे सगळ्या आयफोनच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मोबाइल, लॅपटॉपसह संवादासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्वप्रकारच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये अँटीनाचा वापर केला जातो, सिग्नल धाडणाऱ्या डॉवरशी संपर्क व्हावा यासाठी हा अँटीना दिलेला असतो. अँटीना आणि टॉवर यांच्यात संपर्कासाठी अँटीनातून रेडिएशन उत्सर्जित होतं. या रेडिएशनमुळे त्वचेला खाज सुटणे, त्वचेच्या रंगात बदल होवून ती काळसर होणे असे परिणाम होऊ शकतात. यामुळे अकाली त्वचा निस्तेज होण्याचाही धोका असतो.

फ्रान्सच्या नियामक संस्थेने म्हटले आहे की आयफोन 12 मॉडेल्सचा ‘स्पेसिफिक अॅब्सॉर्प्शन रेट’ (SAR) युरोपियन युनियन (EU) ने ठरवलेल्या कायदेशीर मर्यादेपेक्षा जास्त आहे, ज्यामुळे त्याची विक्री थांबवण्याचे पाऊल उचलण्यात आले आहे. फोनमधून उत्सर्जित होणाऱ्या किती इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी मानवी शरीरात पोहोचतात हे ठरवण्यासाठीचे प्रमाण म्हणजे SAR मूल्य असते. युरोपियन युनियनने हे मूल्य 4.0 वॅट्स प्रति किलोग्रॅमपेक्षा अदिक नसावे असे म्हटले आहे. फ्रान्सधील नियामक संस्थेचे म्हणणे आहे की iPhone 12 मधून निघणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींचे SAR मूल्य 5.74 वॅट्स प्रति किलोग्राम होते.

अ‍ॅपलने सर्व आरोप फेटाळले

अ‍ॅपलने फ्रान्सच्या या निर्णयानंतर लगेचच प्रतिक्रिया दिली असून आणि रेडिएशनशी संबंधित आरोपांचे स्पष्टपणे खंडन केले. कंपनीने म्हटले आहे आमच्या उपकरणांना अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांकडून प्रमाणपत्रे मिळाली असून आम्ही जागतिक रेडिएशन नियमांचे पालन करतो. Apple ने असेही सांगितले की त्यांनी रेडिएशनशी संबंधित चाचणी अहवाल ANFR ला दिले असून यामुळे iPhone 12 चे रेडिएशन धोकादायक नाही हे त्यांना कळेल असे कंपनीने म्हटले आहे.